PM Modi At Quad Summit : आम्‍ही कुणाच्‍याही विरोधात नाही !

‘क्‍वाड’च्‍या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचे विधान

(क्‍वाड म्‍हणजे भारत, अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया आणि जपान या देशांची सुरक्षा सहकार्य संघटना)

पंतप्रधान मोदी ‘क्‍वाड’च्‍या बैठकीत संबोधित करताना

डेलावेअर (अमेरिका) – ‘क्‍वाड’ची बैठक अशा वेळी होत आहे, जेव्‍हा जग संघर्षाने वेढले आहे. अशा स्‍थितीत क्‍वाडने एकत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे. आम्‍ही कुणाच्‍या विरोधात नाही. आम्‍ही नियम-आधारित आंतरराष्‍ट्रीय सुव्‍यवस्‍था, प्रादेशिक अखंडता आणि सर्व समस्‍यांचा शांततापूर्ण निराकरण यांचे समर्थन करतो, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्‍वाड देशांच्‍या बैठकीमध्‍ये मांडली.

१. बैठकीनंतर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांना अमेरिकेच्‍या निवडणुकीनंतर संघटनेच्‍या अस्‍तित्‍वाविषयी प्रश्‍न विचारण्‍यात आला. यावर बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍या खांद्यावर हात ठेवला आणि ‘निवडणुकीनंतरही संघटना कायम रहाणार आहे’, असे स्‍पष्‍ट केले.

२. येथे पंतप्रधान मोदी यांनी हिंद-प्रशांत (हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्‍या किनार्‍यांवरील देश) देशांना ४ कोटी लसी विनामूल्‍य देण्‍याची घोषणा केली. शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांची डेलावेर येथील निवासस्‍थानी भेट घेतली. बायडेन यांनी मोदींचे स्‍वागत केले. यानंतर दोघांमध्‍ये द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांनी जपान आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍या पंतप्रधानांशीही द्विपक्षीय चर्चा केली.