भेसळयुक्‍त तूप पुरवणार्‍यांना सरकार सोडणार नाही ! – Chandrababu Naidu

आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू व माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी

अमरावती (आंध्रप्रदेश) – तिरुपती बालाजी मंदिरात भेसळयुक्‍त तूप पुरवणार्‍यांना राज्‍य सरकार सोडणार नाही, अशी घोषणा आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

वाय.एस्.आर्. काँग्रेसवर टीका करतांना मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू म्‍हणाले की, गायीच्‍या तुपाची किंमत किलोमागे ३२० रुपये कशी काय ? आपली चूक मान्‍य करण्‍याऐवजी ते (माजी मुख्‍यमंत्री जगनमोहन रेड्डी) निर्लज्‍जपणे याला राजकारण कसे म्‍हणू शकतात ? ते तुपाच्‍या गुणवत्तेशी तडजोड कशी करू शकतात? गुणवत्तेसमवेतच पवित्र आचरण आणि कोट्यवधी भाविकांच्‍या भावना जपण्‍याचा आणि टिकवून ठेवण्‍याचा हा विषय आहे. कुणीही भावना, पंरपरा आणि धार्मिक प्रथांशी खेळू शकत नाही. आमचे सरकार मंदिरांचे पावित्र्य आणि भक्‍तांच्‍या भावना जपण्‍याला अतिशय महत्त्व देते. प्रत्‍येक धर्माची स्‍वतःची परंपरा आणि चालीरिती आहेत. त्‍यांचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे

(म्‍हणे) ‘मी कधीही तिरुमला तिरुपती देवस्‍थानाच्‍या कामकाजात हस्‍तक्षेप केला नाही !’ – जगनमोहन रेड्डी

राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी म्‍हणाले की, मी तिरुमला तिरुपती देवस्‍थानाच्‍या दैनंदिन कामकाजात कधीही हस्‍तक्षेप केला नाही. (जगनमोहन रेड्डी यांनी आपल्‍या मर्जीतील लोकांना देवस्‍थान मंडळांचे सदस्‍य केले. त्‍यांनी त्‍यांची माणसे देवस्‍थान मंडळामध्‍ये बसवून देवस्‍थानाच्‍या कामकाजात हस्‍तक्षेप केला. जनता हे सर्व जाणून आहे ! – संपादक) प्रसादाची शुद्धता राखणे हे केवळ देवास्‍थानाचे काम आहे, माझे नाही. कोरोना महामारीच्‍या काळात सर्व संस्‍थांना आर्थिक आव्‍हानांचा सामना करावा लागला. त्‍या वेळी देवस्‍थाननेच मंदिराचा कारभार सांभाळण्‍याचा निर्णय घेतला. यात माझा वैयक्‍तिक सहभाग नव्‍हता. देवस्‍थानाचे दोन्‍ही माजी अध्‍यक्ष वाय.व्‍ही. सुब्‍बा रेड्डी आणि भुम्‍मा करुणाकर रेड्डी यांनी तपासाचे स्‍वागत केले आहे. त्‍यांना निश्‍चिती आहे की, त्‍यांच्‍या देखरेखीखाली कोणतीही चूक झाली नाही.

  • जगनमोहन रेड्डी यांचा थयथयाट

  • (म्‍हणे) ‘मी वेगळ्‍या धर्माचा असल्‍याने लक्ष्य केले जाते !’

जगन मोहन रेड्डी पुढे म्‍हणाले की, चंद्राबाबू नायडू यांनी राजकारणासाठी धर्माचे साहाय्‍य घेण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. मी वेगळ्‍या धर्माचा (ख्रिस्‍ती) आहे. त्‍यामुळे नायडू आणि त्‍यांचा पक्ष मला आणि माझ्‍या कुटुंबाला अपकीर्त करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यांनी माझ्‍या वडिलांच्‍या विरोधातही खोटी माहिती पसरवली; मात्र प्रत्‍येक वेळी त्‍यांच्‍या प्रयत्नांना अपयश आले. या वेळीही त्‍याचे उलटे पडसाद उमटतील; कारण जनतेला सत्‍य ठाऊक आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील अल्‍पसंख्‍यांकांनी एखादा गुन्‍हा केला आणि तो त्‍यांच्‍या अंगलट आल्‍यावर ते कशा प्रकारे स्‍वतःला पीडित असल्‍याचे भासवून सहानुभूती मिळवण्‍याचा प्रयत्न करतात, याचे हे उदाहरण !