भंडारा येथे एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सभा उधळली !
आसंद्या तोडून पोलिसांवर भिरकावल्या !
भंडारा – एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सभा अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी येथे आयोजित केली होती. ही सभा एस्.टी कामगार कृती समितीच्या पदाधिकार्यांनी उधळली. सभेत आसंद्या तोडण्यात आल्या, तसेच पोलिसांवरही आसंद्या फेकण्यात आल्या. धक्काबुक्की झाली. अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. सदावर्ते यांच्या समर्थकांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
वार्षिक विशेषांकावर सत्ताधार्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज, प्रभु श्रीराम यांच्यासह नथुराम गोडसे’ यांचे छायाचित्र लावल्याचे सूत्र विरोधकांनी पुढे करत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधार्यांना धारेवर धरले. सदावर्ते समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाद वाढल्यावर वरील प्रकार झाला. एस्.टी कामगार कृती समितीने सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसर्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली.
सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले की, सोन्याची अंडी देणारी बँक अशी काँग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेत त्यांनी गोंधळ घातला आहे.