पुणे शहरात साडेपाच लाख श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन !
संकलित मूर्ती वाघोली येथील खाणीमध्ये विसर्जित करणार !
पुणे – महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन हौदांमध्ये ५ लाख ५९ सहस्र ९५२ इतक्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १ लाख ७६ सहस्र ६७ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हौदांमध्ये ७५ सहस्र ६४१, लोखंडी टाक्यांमध्ये १ लाख ७६ सहस्र ४३०, संकलन केलेल्या मूर्ती १ लाख २२ सहस्र ७७ अशा एकूण ३ लाख ७४ सहस्र १४८ इतक्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. श्री गणेशोत्सवामध्ये एकूण ५ लाख ५९ सहस्र ९५२ इतक्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संकलन केलेल्या श्री गणेशमूर्ती वाघोली येथील खाणीत विसर्जन करण्यात येणार आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिकामूर्ती पुन्हा खाणीमध्येच विसर्जित करणार, तर श्री गणेशभक्तांनाच नदीत विसर्जन का करू दिले नाही ? खाणीत विसर्जित करतांना कशा प्रकारे मूर्तींचा अवमान होतो, हे जनतेने अनेक बातम्यांच्या माध्यमातून पाहिले आहे. अशा प्रकारे शास्त्रविरोधी कृती करून श्री गणेशाची कृपा होणार कि अवकृपा ? |