कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर कारवाई

सिंगल माल्ट व्हिस्की बनवणार्‍या आस्थापनाला काम बंद करण्याचे आदेश

मडगाव, २१ सप्टेंबर (वार्ता.) – कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या कारखान्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडून प्रदूषण होत असल्याचे सूत्र स्थानिक लोकांनी लावून धरल्याने या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार २० सप्टेंबर या दिवशी ‘क्वालिटी फूड्स’ आणि ‘युनायटेड मरिन प्रॉडक्ट्स’ हे २ कारखाने बंद करण्यात आले, तर २१ सप्टेंबर या दिवशी ‘इंडोटेक आईस अँड कोल्ड स्टोरेज’ आणि जागतिक स्तरावरील गोव्याची सिंगल मार्ट व्हिस्की बनवणारा ‘मे. जॉन डिस्टिलरीज’ या २ कारखान्यांना नोटीस जारी करून कारखाना बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाचे सूत्र कित्येक महिन्यांपासून आहे. ‘कारवाई केली जाईल’, असे शासनाने सांगूनही येथील कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले पाणी उघड्यावर सोडण्यात आल्याने येथील जलस्रोत प्रदूषित होत होते. २० सप्टेंबर या दिवशी स्थानिक आमदारांसह उपजिल्हाधिकार्‍यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीची पहाणी केली. त्या वेळी विविध कारखान्यांमधील प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उपजिल्हाधिकार्‍यांनी याविषयीचा अहवाल आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि पर्यावरणाला अन् मानवी आरोग्याला धोकादायक कारखान्यांवर कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० सप्टेंबर या दिवशी २ कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २१ सप्टेंबर या दिवशी आणखी २ कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली. या सर्व कारखान्यांना २६ सप्टेंबर २०२४ या दिवशी सकाळी ११ वाजता साळगाव येथील कार्यालयात उपस्थित राहून ‘हे कारखाने बंद का करून नयेत ?’ याविषयी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.