नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !
साधकांना सूचना आणि धर्मप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांना विनंती !
‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.
१. देवीच्या मंदिरातील विश्वस्त आणि पुजारी यांना संपर्क करणे
अ. मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना भेटून कुलदेवतेच्या नामजपाच्या पट्ट्या प्रायोजित करण्यास सांगावे.
आ. देवीला कुंकूमार्चन करण्यासाठी सनातनचे कुंकू वापरण्यास पुजार्यांना उद्युक्त करावे.
इ. देवीच्या मंदिरांजवळ सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, सात्त्विक उत्पादने आिण पंचांग यांचे प्रदर्शन लावावे.
ई. ‘शास्त्रोक्त पद्धतीने देवीची उपासना कशी करावी ?’, याविषयी अमूल्य ज्ञान देणारे आणि धर्मशिक्षणाविषयी जनसामान्यांना अवगत करणारे फलकही मंदिरात लावता येतील.
२. नवरात्रोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटणे
अ. धर्मशास्त्रानुसार हा उत्सव साजरा करण्यासाठी, तसेच व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांच्या प्रमुखांना आवाहन करता येईल. यासाठी धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचेही साहाय्य घेऊ शकतो.
आ. बरीच मंडळे देवीच्या असात्त्विक मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्यांना धर्मशास्त्रानुसार योग्य अशा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास उद्युक्त करावे.
इ. मंडळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये ‘शक्तीच्या उपासनेचे महत्त्व’, ‘साधना’, ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ आदी विषयांवर प्रवचन आयोजित करू शकतो. ‘हिंदु युवक-युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता’, हा विषय मांडून त्याची प्रात्यक्षिकेही दाखवू शकतो.
ई. मंडळात आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिक म्हणून, तसेच कार्यक्रमांसाठी मंडळांना भेट देणार्या अतिथींना भेटवस्तू म्हणून सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच अन्य उत्पादने देण्यास सुचवावे.
उ. देवीपूजनासाठी उदबत्ती, कापूर, कुंकू, अष्टगंध आदी सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने वापरण्याची विनंती करावी.
३. जनसामान्यांचे प्रबोधन आणि व्यापक संघटन करणे
अ. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी देवीभक्तांच्या साहाय्याने ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप सामूहिकरित्या करण्याचे नियोजन करावे.
आ. बरेच जण नवरात्रीत प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन आणि भेटवस्तू देतात. सनातनच्या ‘बालसंस्कार’ मालिकेतील ‘बोधकथा’, ‘अभ्यास कसा करावा ?’, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ आदी ग्रंथ कुमारिकेला भेट म्हणून देता येतील.
इ. दांडिया, गरबा आदी माध्यमांतून हिडिस नृत्य करणे, अश्लील अंगविक्षेप करणे आदी अपप्रकार घडत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पवित्र अशा या नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. त्याविषयी युवक-युवतींचे प्रबोधन करावे.
नवरात्रोत्सवातून होणारी धर्महानी रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करून उत्सवाचे पावित्र्य राखणे, हे प्रत्येक देवीभक्ताचे आद्य कर्तव्य आहे. हे अपप्रकार रोखून ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करणे आणि इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करणे, ही देवीची श्रेष्ठ प्रतीची उपासना ठरेल !’ (८.८.२०२४)