पूर्वजांना मुक्ती देणारी गयानगरी !
सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने…
‘भारतात श्राद्ध, पिंडदान आणि अन्य मृत्यूत्तर विधी करण्यासाठी काही निवडक महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामध्ये गंगेचे घाट, काशीसह ज्योर्तिलिंगांच्या ठिकाणी, हरिद्वार (उत्तराखंड), गया (बिहार) इत्यादी ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत. या सर्वांमध्ये गया स्थानाला पुष्कळ महत्त्व आहे. बिहार राज्यातील या स्थानाला मुक्तीचे स्थान म्हणून मान्यता आहे. हिंदूंसाठी पवित्र असलेल्या या स्थानाविषयी पितृपक्षाच्या निमित्ताने जाणून घेऊया.’
श्री विष्णुपाद मंदिर
भगवान श्रीविष्णूंनी गयासुराच्या शरिरावर, म्हणजेच भूमीवर जेथे चरण ठेवले, तेथे त्यांचे चरण भूमीवर उमटले आहेत. या चरणांना ‘विष्णुपाद’ म्हणतात. या ठिकाणी मंदिर असून त्याला ‘श्री विष्णुपाद मंदिर’ म्हणतात. श्राद्धादी विधी हे बहुतांश १२ ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी होतात, म्हणजे तेथे पिंड स्वयं महादेव स्वीकारतात, तर गया येथे भगवान श्रीविष्णु पितृदेवतेच्या रूपात निवास करत असल्याने ते पिंड स्वीकारतात.
बोधगया
गया येथून १५ किलोमीटर दूर अंतरावर बोधगया आहे. जेथे बोधी वृक्षाखाली गौतम बुद्ध यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली होती.
गयाचा इतिहास
गया हे मोगलकाळात त्यांच्या कह्यात होते. पुढे वर्ष १७२७ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी येथील श्री विष्णुपाद मंदिराचे पुनर्निर्माण केले. नंतर इंग्रजांच्या भारतावर राज्य करण्याच्या काळात त्यांच्या कह्यात राहिले होते.
गया येथे प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांनी केले पिंडदान
गया येथे स्वत: प्रभु श्रीरामाने राजा दशरथाचे पिंडदान केले होते आणि त्यांना मुक्ती मिळाली होती. सीतामातेनेही वाळूचे पिंड बनवून राजा दशरथाचे पिंडदान केले होते. त्यामुळे येथे वाळूचे पिंड केले जातात. पूर्वी गया येथे पिंडदानासाठी ३६० वेदी होत्या, त्यातील आता केवळ ४८ उरल्या आहेत. भारतभरात श्राद्धविधी करण्यासाठी ५५ ठिकाणे महत्त्वाची मानली जातात, त्यापैकी गया हे सर्वांत महत्त्वाचे ठिकाण आहे. युधिष्ठिराने महाभारत युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचे श्राद्ध गया येथे केले होते आणि त्यांनाही मुक्ती मिळवून दिली.
गया स्थानाची उत्पत्ती
‘सहस्रो वर्षांपूर्वी गयासुर नावाचा एक विष्णुभक्त असुर होता. त्याने पुष्कळ तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून स्वत:चे शरीर देवतांप्रमाणे पवित्र होण्याचे वरदान मागितले. त्याचप्रमाणे त्याला पाहूनच लोक पापमुक्त झाले पाहिजेत, असेही सांगितले. ब्रह्मदेवाने वरदान दिल्यावर लोक पाप करायचे आणि गयासुराला पाहून पापमुक्त व्हायचे. त्यामुळे पापही वाढत होते आणि देवतांनाही त्रास होत होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी देवतांनी उपाय काढला. त्यांनी गयासुराकडे यज्ञासाठी पवित्र स्थानाची मागणी केली. तेव्हा गयासुराने त्यांना त्याच्या पाठीवर यज्ञ करण्यास सांगितले. यज्ञासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी तो भूमीवर आडवा झाला. तेव्हा त्याचे शरीर ५ कोस दूरपर्यंत पसरले आणि देवतांनी यज्ञ चालू केला. देवतांनी प्रसन्न होऊन गयासुराला वर दिला की, जो या ठिकाणी स्वत:च्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण विधी करील, त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळेल. यज्ञ संपल्यानंतर भगवान श्रीविष्णूंनी त्याच्या पाठीवर शिळा ठेवली आणि ते स्वत: तेथे उभे राहिले. ५ कोस दूर पसरलेल्या या क्षेत्राला ‘गया क्षेत्र’ म्हणतात.
गया स्थानाचे महत्त्व
वायु पुराण, गरुड पुराण आणि विष्णु पुराण यांमध्ये गया तीर्थाचे महत्त्व सांगितले आहे. या तीर्थक्षेत्राला ‘मोक्षस्थान’ किंवा ‘मोक्षभूमी’ही म्हणतात. येथे पितरांसाठी पिंडदान आणि श्राद्ध करून त्यांना चांगली गती मिळते. येथे पितृपक्षाच्या कालावधीत वर्षातून एकदाच मेळा भरतो, ज्याला ‘पितृपक्ष मेळा’ म्हणतात.
फल्गु नदी
येथे फल्गु नदीच्या किनार्यावर पिंडदान केले जाते. ही नदी शापित आहे, म्हणजे सीतामातेच्या शापाने नदीवरून जलहीन दिसली, तरी ती भूगर्भातून प्रवाहीत आहे, असे मानले जाते. या नदीचे पाणी पुढे गंगा नदीला मिळते. या नदीच्या किनारी सर्वप्रथम ब्रह्मदेव गेले, तेव्हा त्यांनी हे सर्वाेत्तम तीर्थ मानले होते. त्यानंतर गयामध्ये श्राद्ध आणि पिंडदान यांची परंपरा निर्माण झाली. ‘गया सो गया’, असे म्हटले जाते, म्हणजे गया येथे एकदा श्राद्ध केले की, पुन्हा करण्यासारखे काही उरत नाही.
प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता फल्गु नदीच्या किनार्यावर राजा दशरथासाठी पिंडदान करण्यासाठी येतात. श्रीराम, लक्ष्मण त्यासाठी आवश्यक ती सामुग्री आणण्यासाठी नगरात जातात, तर सीतामाता तेथेच थांबते. पुष्कळ वेळ होऊनही श्रीराम, लक्ष्मण येत नाही. राजा दशरथाचा आत्मा पिंडदानासाठी व्याकुळ झालेला असल्यामुळे माता सीताच राजा दशरथासाठी पिंडदान करते. या वेळी ती फल्गु नदी, गाय, वटवृक्ष, केतकी वृक्ष, ब्राह्मण यांना साक्षी मानून पिंडदान करते. श्रीराम, लक्ष्मण आल्यावर दशरथाचे पिंडदान केले, असे माता सीतेने सांगितल्यावरही त्यांना ते खरे वाटत नाही; म्हणून ते साक्ष विचारतात. तेव्हा सीतामाता साक्षी मानलेल्यांना विचारणा करते, तेव्हा वटवृक्ष सोडून अन्य त्यावर काहीच बोलत नाही. तेव्हा सीतामाता क्रोधित होऊन फल्गु नदीसह गाय, केतकी वृक्ष, ब्राह्मण यांना शाप देते, तर वटवृक्षाला आशीर्वाद देते. सीतामातेच्या शापामुळे फल्गु नदी केवळ नावाची नदी राहिली आणि तिच्यात पाणी नसते.
महाराष्ट्रीयन पुरोहित
येथे पुरोहित किंवा पौरोहित्य करणार्यांना ‘पंडा’ असे संबोधले जाते. येथे हिंदीमिश्रित मराठी बोलणारे पुरोहितांची भेट झाली, जे येथे महाराष्ट्रातून काही शतकांपूर्वी स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या मागील १२ वी पिढी येथे स्थायिक झाली आहे.
गया येथे वातावरण जड आणि दाबयुक्त जाणवणे
गया येथे श्री विष्णुपाद मंदिर सोडल्यास वातावरणात जडत्व आणि ते दाबयुक्त जाणवते. विशेषत: फल्गु नदीच्या किनार्याजवळ जडत्व आणि रूक्षता अधिक प्रमाणात वातावरणात जाणवते.
जाणवलेली अयोग्य सूत्रे
सर्वसाधारणपणे एखादा धार्मिक विधी अथवा श्राद्धादी विधी पूर्ण केल्यानंतर आपण ब्राह्मणाला यथायोग्य दक्षिणा देतो. येथे पंडा, म्हणजे पुरोहित विधीच्या प्रारंभीच दक्षिणा देण्यास सांगतात आणि नंतर विधीच्या ठिकाणी म्हणजे फल्गु नदीजवळ जाण्यास सांगतात.
विष्णुपादाच्या ठिकाणी २ पिंड अर्पण करायचे असतात, म्हणजे हा वेगळा विधी नसून केवळ श्रीविष्णूला पिंडदान केले जाते; मात्र येथेही पुरोहित दक्षिणा मागतात. पुन्हा प्रत्यक्ष विधी करणारा पुरोहित तोही त्याची वेगळी दक्षिणा मागतो. ‘गयेच्या जवळ श्राद्ध करतांना तुम्हाला ही संधी पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे अधिकाधिक दान करा (ज्यामध्ये भांडी, वस्त्रे, पैसे)’, असे सांगून ते घेण्यासाठी पुन्हा एका व्यक्तीची नियुक्ती केलेली असते. येथे मात्र यजमानाचे धाबे दणाणतात. तो काहीच पैसे घेऊन न आल्यास आता ‘ऑनलाईन’ पैसे देण्याची सुविधा आहे, तसेच काही पैसे आणले असतील, तर ते ‘अधिकाधिक द्या’, असे सांगितले जाते. परिणामी यजमानाची एक प्रकारे लुबाडणूक होते.
श्री विष्णुपाद मंदिरातील श्री विष्णुच्या चरणांचे दर्शन काही काही वेळाने गर्भगृहाचा मुख्य दरवाजा बंद करून थांबवले जाते; मात्र गर्भगृहात सेवा करणारे काही पुरोहित शेजारी असलेले दरवाजे उघडून भाविकांना दर्शन तर देतात; मात्र दक्षिणाही मागतात.
बिहार राज्य असल्यामुळे काही प्रमाणात या क्षेत्रात अव्यवस्था जाणवत असली, तरी हे धार्मिक स्थान असल्यामुळे स्थानिकांनी थोडीफार स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.’
श्री गुरुचरणार्पणमस्तु।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१९.९.२०२४)