हिंदु जनजागृती समितीने राबवलेले ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ : भूमिका आणि अनुभवकथन
मागील वर्षभरात सनातन धर्म नष्ट करणार्यांच्या विरोधात जागृतीसाठी ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ चालवण्यात आले. आपल्याला लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या हे विषय ठाऊक आहेत; सनातन धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र कोण करत आहे ? त्याच्या पाठीमागे कोण आहे ? त्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) कशी कार्यरत आहे, देशातील बस्तर, गडचिरोली, दंडकारण्य या भागांतील नक्षलवादाविषयी आपण ऐकलेले आहे. आपल्या सर्वांसमोर नक्षलवाद म्हटले की, हिंसाचार, घातपात, वनवासी नागरिकांच्या, तसेच सैनिकांच्या क्रूर पद्धतीने केलेल्या हत्या हे डोळ्यांसमोर उभे रहाते; मात्र गेल्या काही काळापासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, देहली, भाग्यनगर, चेन्नई अशा प्रमुख शहरांतून पसरवला जाणारा ‘अर्बन (शहरी) नक्षलवाद’ काय आहे, त्यांचा अजेंडा म्हणजेच उद्देश काय आहे, हे आपल्याला ठाऊक नसते.
यासाठी आपण देहलीतील ‘जे.एन्.यु’ (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) या राष्ट्रीय विद्यापिठातील घटना आठवा ! तेथे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतातील बुद्धीमान युवकांच्या मेंदूमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा काही अभ्यासक्रमातून शिरलेल्या नाहीत, तर त्यासाठी कुणीतरी षड्यंत्र करून त्यांच्या डोक्यात हे विष भरलेले आहे. पाकिस्तानातील नागरिकांनी भारताच्या विरोधात बोलणे, घोषणा देणे, हे लक्षात येते; मात्र ज्या युवकांवर भविष्यातील भारताचे दायित्व आहे, तेच जर भारत तोडण्याच्या घोषणा करू लागले, तर काय करणार ? त्यामुळे आपल्या भारतीय नागरिकांमध्ये देशद्रोही विचार भरून त्यांनाच भारताच्या विरोधात उभे करून अंतर्गत युद्धाकडे देशाला नेणे, हे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र आहे. त्यासाठी त्यांनी शहरी भागांमध्ये विशेष करून महाविद्यालये, विद्यापिठे, आय.आय.टी., यांसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांना लक्ष्य करून त्यातून अर्बन नक्षलवाद वाढवण्याचे कार्य चालू आहे. त्यामुळे या सामान्य हिंदूंपुढे हे सर्व षड्यंत्र उघड करण्यासाठीच, हे ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान होते.
१. द्रमुकचे उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा, काँग्रेसचे प्रियंक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांची धर्मद्रोही भाषा
एका मंदिरासाठीच्या कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिनने ‘सनातन धर्म म्हणजे ‘डेंग्यू – मलेरिया’ यांच्यासारखा रोग आहे’, असे वक्तव्य केले. ए. राजा जो ‘टू जी स्पेक्ट्रम’मध्ये सहभागी होता, तो म्हणतो, ‘‘हिंदु धर्म, सनातन धर्म हा डेंग्यूसारखा नाही, तर ‘एच्.आय.व्ही.’ (HIV) सारखा भयानक आहे.’’ प्रियांक खर्गे कर्नाटकामध्ये वक्तव्य करतात, ‘हिंदु धर्म रोगासारखाच आहे.’ महाराष्ट्रातील जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले, ‘सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे. सनातन धर्म नष्ट केला पाहिजे.’ विशेष म्हणजे ही वक्तव्ये एका मागून एक झाली. एवढी सगळी वक्तव्ये झाली, तरी त्याला हिंदु समाजाने कोणतीही तीव्र प्रतिक्रिया न दिल्यामुळे या धर्मांधांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्याकडून पुनःपुन्हा हिंदु धर्माविरुद्ध वक्तव्य केली गेली. या सर्वांची वक्तव्ये झाल्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकार निखिल वागळे यांनीसुद्धा वक्तव्य केले, ‘उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्याशी मी सहमत आहे आणि सनातन धर्म रोगासारखाच आहे.’ या तुलनेत आपण हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे की, देहलीतील भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केवळ एका चॅनेलवरील चर्चेत एक वक्तव्य इस्लामच्या विरोधात केले, तर देशभरात ‘सर तन से जुदा, सर तन से जुदा’ (शिरच्छेदाच्या) घोषणा देत प्रचंड मोठे मोर्चे काढले गेले. आंदोलने, दंगली, जाळपोळ केली गेली. त्याही पुढे जाऊन त्यांनी सामाजिक माध्यमांवर नुपूर शर्मांच्या ‘पोस्ट’चे (लिखाणाचे) समर्थन केल्यामुळे राजस्थान येथील कन्हैया कुमार, महाराष्ट्रातील उमेश कोल्हे आणि दक्षिणेतील २ हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या केल्या. मुसलमान आपल्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी जागृत आहेत, ते २० कोटी असूनही लगेचच रस्त्यावर येतात; परंतु आम्ही हिंदु ८० कोटी असूनही आम्हाला सनातन धर्माचा अवमान झाला, तरी त्याचा राग येत नाही किंवा चीड येत नाही. अर्थात् याचा अर्थ रस्त्यावर उतरून हिंसा करणे असा नाही; मात्र १ लाख हिंदू जरी रस्त्यावर उतरले असते, तरी परिस्थिती पालटली असती. त्यामुळे एकत्र येऊन किमान रस्त्यावर उतरून विरोध तरी करणे आवश्यक आहे.
२. ‘डिसमेंटल ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे समूळ उच्चाटन) या नावाखाली अमेरिकेमध्ये हिंदूंचा अवमान
‘डिसमेंटल ग्लोबल हिंदुत्व (DGH)’ या नावाखाली अमेरिकेमध्ये २ वर्षांपूर्वी परिषद झाली. या परिषदेचा विषय ‘हिंदुत्व आणि सनातन धर्म यांना कसे नष्ट करता येईल ?’, हा होता. अमेरिकेमध्ये यासंदर्भात प्रचार करून ४० विद्यापिठांच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले होते. या कार्यक्रमाच्या प्रचाराच्या ‘पोस्ट’मध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला हातोडीने उखडतांना दाखवले होते. याचा अर्थ काय होतो ? यांना नक्की कोणते हिंदुत्व उखडून टाकायचे आहे ? सनातन धर्माला भारतात नष्ट करता येत नाही, तर विदेशात जाऊन अशा परिषदा घेतल्या जातात. यांचे आयोजक, वक्ते आणि सहभागी लोक यांचा विचार केला, तर ही सर्व मंडळी आपल्याच देशात राहून देशविरोधी कारवाया करणारी ‘अर्बन नक्षलवादी’च आहेत, हे लक्षात येते. अशा किती संघटना, विद्यापिठे आणि विचारवंत या व्यवस्थेचा भाग झाले आहेत ? याचा विचार करून आपल्याला पुढील वर्षभराच्या योजना आखाव्या लागतील.
३. कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि मुसलमान यांनी एकत्र येऊन सनातन धर्माच्या विरोधात कार्य करणे
साम्यवाद्यांकडून प्रचार केला जातो की, जगात सर्वांधिक हत्या करणारा हिटलर आहे; मात्र येथे लक्षात घेतले पाहिजे की, जगभरामध्ये यहुदी, सामान्य नागरिक, शेतकरी यांच्या हिंस्त्र पद्धतीने हत्या करणार्यांच्या सूचीत पहिले नाव साम्यवाद्यांचे येते. रशिया, चीन, जर्मनी, फ्रान्स, कंबोडिया अशा अनेक देशांत आतापर्यंत ९ कोटी ४० लाख लोकांच्या हत्या या साम्यवाद्यांनी केलेल्या आहेत; मात्र हेच साम्यवादी आज हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला ‘मानवतावादी’ म्हणून घेतात.
याच अर्बन नक्षलवादाशी जोडलेले डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश या ४ हत्या झाल्यावर देशातील साम्यवादी विचारांच्या मान्यवरांनी ‘पुरस्कारवापसी’ करण्यासह भारतात रहाण्याची भीती वाटू लागल्याची ओरड चालू केली. म. गांधींच्या हत्येनंतर देशात याच ४ हत्या झाल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले; मात्र भारतात मागील २५ वर्षांत नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक सैनिक, पोलीस, राजकीय नेते, सामान्य नागरिक यांच्या ज्या हत्या केलेल्या आहेत, देशभरात कमलेश तिवारी, किशन भरवाड, प्रवीण नेट्टारू, प्रशांत पुजारी यांच्यासारख्या सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या ज्या हत्या केल्या गेल्या, त्यांच्या संदर्भात कधीही चर्चा केली जात नाही. बंगालमध्ये मालदा, मुर्शिदाबाद, संदेशखालीमध्ये हिंदूंवर जे अत्याचार चालू आहेत, काश्मीरमध्ये लाखो हिंदूंचा जो वंशविच्छेद करण्यात आला, त्यांच्याविषयी कधी या साम्यवाद्यांनी आवाज उठवला आहे का ?, आंदोलन केले आहे का ? निखिल वागळे, सागरिका घोष, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, रविशकुमार यांच्यासारख्या पत्रकारांची टोळी ही याच साम्यवादी इकोसिस्टीमसाठी काम करून अर्बन नक्षलवाद्यांना साहाय्य करत असते.
याचे कारण म्हणजे साम्यवादी आणि अर्बन (शहरी) नक्षलवादी या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. आपल्याला लक्षात येईल की, इस्लामी राष्ट्रांत साम्यवाद्यांची चळवळ उभी राहू शकत नाही, तर चीन-रशिया यांसारख्या साम्यवादी राष्ट्रांमध्ये मुसलमानांवर नियम लादून इस्लामला संपवण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु भारतात हेच एकमेकांचे विरोधक असणारे साम्यवादी आणि मुसलमान एकत्र काम करत आहेत अन् त्या दोघांचाही ‘अजेंडा’ (कार्यसूची) एकच आहे, तो म्हणजे ‘सनातन धर्माला नष्ट करणे’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
४. विद्यापिठांमध्ये देशद्रोह्यांचे आणि अर्बन नक्षलवाद्यांचे अड्डे निर्माण होणे
आज ‘जे.एन्.यु.’मध्ये केवळ ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा दिल्या जात नसून, स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर विद्यापिठात मिठाई वाटण्यात आली, महिषासुर जयंती साजरी करून ‘दुर्गादेवीला वेश्या’ म्हटले गेले. सनातन धर्माच्या विरोधातील हा प्रचार आता जे.एन्.यु. पुरता मर्यादित राहिला नसून तो मुंबई, देहली, पुणे, चेन्नई, भाग्यनगर, कोलकाता अशा अनेक मुख्य शहरांतील विद्यापिठांत पोचला आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, म्हणजे दुसरी ‘जे.एन्.यू.’ होऊ पहात आहे. तेथे ललित कला मंचकडून प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे विडंबन करणारी नाटिका सादर करण्यात आली. काही वर्षांपूर्वी पुण्यातीलच कबीर कला मंच नावाच्या संघटनेतील युवक नक्षलवादी कारवायांत पकडण्यात आले. यात सहभागी विद्यार्थी भारतीयच आहेत; मात्र वैचारिक अजेंडा अर्बन नक्षलवाद्यांचा आहे.
५. कोरेगाव-भीमा प्रकरणातील अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग आणि न्यायव्यवस्थेचे त्यांना साहाय्य (?)
काही वर्षांपूर्वी कोरेगाव-भीमामध्ये जी दंगल झाली आणि त्यातून एल्गार परिषदेचे षड्यंत्र उघड झाले. त्यात सहभागी असणार्यांना अटक केल्यावर त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. त्यात अटक केलेले गौतम नवलखा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा हे सर्व साम्यवादी विचारांचे आणि उच्चविद्याविभूषित होते. एवढा गंभीर कट रचूनही त्यांना अटक झाल्याबरोबर त्यांची साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) कार्यरत झाली. सरकारने अटक करून त्यांच्यावर कसा अन्याय केला आहे, याच्या चर्चा चालू झाल्या. लगेच दुसर्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली गेली आणि न्यायालयानेही त्वरित सुनावणी घेऊन अटक झालेली मंडळी प्रतिष्ठित असल्याने त्यांना पोलीस कोठडी न देता, त्यांच्याच घरात ‘हाऊस अरेस्ट’ (स्थानबद्ध) करण्याचे आदेश दिले. भारतातील कोणत्याही कायद्यात ‘हाऊस अरेस्ट’चा उल्लेख नसतांनाही त्यांना ही विशेष सुविधा का दिली गेली ? हे एखाद्या हिंदुत्वनिष्ठाच्या संदर्भात घडले असते का ? यातून ही इकोसिस्टीम आणि तिचा प्रभाव लक्षात येतो. त्यामुळे या अर्बन नक्षलवाद्यांनी आज मानवतावादी, कुणी पर्यावरणवाद्याचा, कुणी सामाजिक कार्यकर्त्याचा, तर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुखवटा घातलेला आहे; परंतु सगळ्यांचा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे सनातन हिंदु धर्माचा विरोध आणि भारत विरोध ! अशांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याची आज आवश्यकता निर्माण झालेली आहे.
६. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध !
यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही वेगळी नाही. नाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे; पण त्यांचे काम श्रद्धा निर्मूलनाचे ! त्यांनी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करतांना त्यामध्ये अनेक हिंदुविरोधी कलमे घेतली होती, उदा. कोणत्याही मूर्तीसमोर बळी दिला, तर तो दंडनीय गुन्हा ठरेल. येथे लक्षात घेतले पाहिजे की, मूर्तीपूजा फक्त हिंदु धर्मातच आहे, म्हणजे ईदच्या कुर्बानीच्या नावे कितीही बकरे कापले, तरी ती अंधश्रद्धा आणि गुन्हा नाही ! वर्ष २०११ मध्ये काँग्रेस सत्तेत असतांना महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचा अहवाल होता, ‘महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या ५५ संघटना आहेत. त्याच्यातील ५० वी संघटना ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. त्यांचे २ कार्यकर्ते नरेंद्र भूर्ले आणि नरेश बनसोड हे गोंदीया या ठिकाणी नक्षलवादी कारवायांमध्ये शस्त्रांसह पकडले होते. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी शस्त्रास्त्रांची आवश्यकता असते का ? त्यामुळे हेसुद्धा अर्बन नक्षलवादीच आहेत. डॉ. दाभोलकरांना ‘स्विस एड् फाऊंडेशन’सारख्या भारतविरोधी संघटनांकडून कोट्यवधी रुपये मिळतात. ‘स्विस एड् फाऊंडेशन’ तिच्या संकेतस्थळावर भारतातील काश्मीर पाकिस्तानमध्ये दाखवते ! यावरून लक्षात येते की, तेसुद्धा या भारतविरोधी इकोसिस्टीमचाच भाग आहेत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सहस्राे किलोमीटर दूर असलेल्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षलवाद्यांकडून सरकारच्या निषेधाचा फलक कसा लागतो ? याकडे सर्वांचे लक्ष जावे, यासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ घेतले आहे.
७. हिंदु जनजागृती समितीकडून राबवण्यात येणारे ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान
जर आघातांच्या वेळी मुसलमान, ख्रिस्ती एकत्र येतात, तर आम्ही हिंदूंनीसुद्धा संघटित झाले पाहिजे. या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ अनेक ठिकाणी राबवण्यात आले. हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सनातन धर्मरक्षक म्हणून प्रत्येक आघातांच्या वेळी पुढे आले पाहिजे. धर्मावरील आघात रोखण्यासाठी काही तरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यात समाजात जागृती करणे, सनातन धर्मविरोधी घटनांच्या विरोधात आंदोलन करणे, लेखकांनी त्याविरोधात लिखाण करणे, वक्त्यांनी त्यासंदर्भात बोलणे, समाजमाध्यमांत प्रसिद्ध असणार्यांनी त्या क्षेत्रातून जगभर प्रसार करणे आणि अधिवक्त्यांनी कायदेशीर लढा देणे, असे प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपली सनातन धर्मरक्षकची हिंदू इकोसिस्टीम निर्माण होऊ शकते.
समितीने ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांत राबवले. त्यामध्ये २५० हून अधिक कार्यक्रमांत १० सहस्र लोक सहभागी झाले होते. सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ७५ हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या. यात उपस्थित युवकांनी शाळा-महाविद्यालयांमध्येही असे कार्यक्रम घेण्याची विनंती केली. यातून लक्षात येते की, आपल्या हिंदु युवापिढीला साम्यवाद्यांच्या षड्यंत्रापासून दूर ठेवून सनातन धर्माच्या रक्षणासाठी सक्रीय करण्यासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ देशभरात नेण्याची आवश्यकता आहे.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक ! |