हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

(भाग १)

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण

‘व्यक्तीच्या डाव्या हातावरील रेषांवरून तिच्या मागील जन्माविषयी बोध होतो. मागील जन्मात व्यक्तीचा स्वभाव, क्षमता, कौशल्ये, कार्यक्षेत्र, प्रारब्ध, साधना इत्यादींच्या संदर्भात माहिती मिळते. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या हाताचे विश्लेषण पुढे दिले आहे.

१ अ. गतजन्मात सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या साधनेत प्रारंभी सातत्य नसणे; पण नंतर गुरुकृपेने तीव्र साधना होणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावरील भाग्यरेषा (अध्यात्मरेषा) मध्यभागी तुटलेली आहे, तसेच ती सरळ नाही; पण शेवटी उठावदार आहे. यावरून लक्षात येते की, गतजन्मी त्यांच्या साधनेत प्रारंभी सातत्य नव्हते; पण नंतर गुरुकृपेने ते तीव्र साधना करत होते.

(‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने मी तीव्र साधना करू लागलो.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१ आ. सद्गुरु डॉ. पिंगळे अनेक जन्मांपासून साधनारत असणे : त्यांच्या डाव्या तळहातावरील भाग्यरेषा (अध्यात्मरेषा) ही जीवनरेषेच्या खालून चालू होत आहे. यावरून ‘ते अनेक जन्मांपासून साधना करत आहेत’, असे लक्षात येते.

(‘वर्ष २००० मध्ये सातारा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची जाहीर सभा होती. त्या वेळी एका साधकाने ‘डॉ. पिंगळे बैठकीत काही बोलत नाहीत’, असे सांगितले. याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले, ‘‘डॉ. पिंगळे यांनी आधीच्या ३-४ जन्मांमध्ये व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ध्यानमार्गाने साधना केली आहे. आता या जन्मात त्यांची समष्टी साधना होण्यासाठी त्यांना बोलण्याची संधी देऊ.’’ त्यामुळे माझ्यासंदर्भात येथे लिहिलेले सूत्र हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या दैवी शब्दांशी जुळणारे आहे. माझ्यामध्ये जी क्षमता आणि जे गुण आहेत, तसेच गुरुसेवा अन् धर्मप्रसार करतांना मी जे मोकळेपणाने बोलू शकतो, ते केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच !’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ इ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या तळहातावर आध्यात्मिक उन्नती दर्शवणारी चिन्हे असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावर भाग्य रेषेच्या साहाय्याने ‘मत्स्य’ (माशाच्या) आकाराची २ चिन्हे निर्माण झाली आहेत. ही पवित्र चिन्हे सद्गुरु डॉ. पिंगळे यांची आध्यात्मिक उन्नती दर्शवतात.

(‘मला वाटते की, सामान्य मनुष्याची किंवा साधकाची ‘भाग्यरेषा’ ही पूर्वजन्मात त्याच्यावर असलेली ईश्वराची कृपा किंवा गुरूंची कृपा दर्शवते. जसे मनुष्याला पूर्वजन्मांतील कर्मांमुळे प्रारब्ध आणि संचित प्राप्त होते, तसेच ईश्वराची किंवा गुरूंची कृपाही प्राप्त हाेते. त्यामुळे व्यक्तीचे भाग्य म्हणजे पूर्वजन्मांतील कर्मांमुळे तिच्यावर असलेली ईश्वराची किंवा गुरूंची कृपा होय !’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

१ ई. सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी पूर्वजन्मात अध्यात्माकडे वळण्याचे कारण : त्यांच्या डाव्या तळहातावरील हृदयरेषा उठावदार आणि गडद असल्याने ते स्वभावाने सहानुभूती बाळगणारे, इतरांची काळजी घेणारे, प्रेमळ आणि दयाळू होते. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यांचे विचार आणि निर्णय प्रथम हृदयातून (मनातून) आणि नंतर बुद्धीतून येत; परंतु त्यांच्या या भावनिक, सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू वर्तनाचा लोकांनी अपलाभ घेतला असावा. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या हृदयरेषेला अनेक लहान रेषांनी भेदले आहे. यावरून लक्षात येते की, त्यांना आलेल्या नैराश्यामुळे किंवा मनाला होणार्‍या वेदनांमुळे ते अध्यात्माकडे वळले असावेत.

(१. ‘माझे नातेवाईक सुशिक्षित आणि व्यवहारात स्थिर असूनही त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्यामुळे त्यांनी माझ्या आईला अन् परस्परांना दिलेली वागणूक पाहून मी त्यांच्यापासून अलिप्त झालो. तेव्हा माझ्या मनात कुणाविषयीही प्रतिक्रिया आल्या नाहीत.

२. काही लोकांचे वरकरणी चांगले वागणे; पण परस्परविरोधी कृती पाहून माझ्या त्यांच्याविषयी असलेल्या अपेक्षा न्यून झाल्या.

३. मी महाविद्यालयात शिकत असतांना काही वेळा माझ्या पैशांवर मित्रांनी मजा केली; परंतु ज्या वेळी मला पैशांची आवश्यकता होती, तेव्हा त्यांनी मला साहाय्य करण्यास असमर्थता दर्शवली; पण त्यामुळे आमच्या मैत्रीत बाधा न येता, माझी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा राहिली नाही.

४. असेच आणखी काही प्रसंग असतील; पण नंतर साधना करतांना माझ्या लक्षात आले की, या सर्व प्रसंगांमुळे माझ्या प्रारब्धानुसार असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडला गेला, तसेच हे सर्व प्रसंग, म्हणजे ‘भविष्यात माझा आध्यात्मिक प्रवास चालू होऊन मी गुरुचरणांशी यावे’, यासाठी असलेले दैवी नियोजन होते.

५. वर्ष १९९६ मध्ये जेव्हा मी प्रथमच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे नाव ऐकले, तेव्हा ‘मला याच दैवी विभूतीची प्रतीक्षा होती’, अशी मला आतून जाणीव झाली. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वैद्यकीय व्यवसाय न करता पूर्णवेळ साधक होण्याचा निर्णय घेऊ शकलो. त्यांनीच मला त्यांच्या चरणांशी बोलावले आणि कृपा केली. त्यांनी मला प्रत्येकात गुरुतत्त्व पहाण्यास शिकवले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तिन्ही मोक्षगुरु माझ्यासाठी एकच असून त्यांची चरणसेवा करणे अन् त्यांच्या दैवी कार्याचा जगभर प्रसार करणे, यांसाठी माझा जन्म झाला आहे’, असे मला वाटते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ उ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांना आरंभी आध्यात्मिक त्रास असणे : काही आध्यात्मिक त्रासांमुळे सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावरील शुक्र ग्रहाच्या उंचवट्यावर कर्मबंधने दर्शवणार्‍या गडद रेषा आहेत. त्यांची तर्जनी मधल्या (शनीच्या) बोटाकडे वळलेली आहे अन् त्रासामुळे तिच्यावर काही खुणा आहेत.

(‘वर्ष १९९९ ते वर्ष २०१० या काळात मला वाईट शक्तींचा त्रास झाला. माझ्या जीवनातील तो परिवर्तनाचा काळ होता. मला असलेले वाईट शक्तींचे त्रास लोकांना दिसत होते; पण मला गुरुदेवांची कृपा दिसत होती आणि मी ती अनुभवत होतो. गुरुदेवांचा अध्यात्मातील अधिकार पाहून माझी त्यांच्यावरील श्रद्धा बळकट होत होती. ‘साधनेमुळे माझ्यातील वाढलेल्या क्षमतेच्या रूपात गुरुदेव माझ्या अंतःकरणात स्थित आहेत’, असे मला वाटते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव जेव्हा एखाद्या साधकाचा ‘सेवक’ म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्या साधकाची मर्यादित क्षमता अमर्याद होते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ ऊ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टी असणे : त्यांच्या डाव्या तळहातावरील सूर्यरेषा ही त्यांच्यावर असलेली ईश्वराची कृपादृष्टी दर्शवते. गतजन्मी त्यांना धन, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांचा लाभ झाल्यामुळे त्यांचे जीवन चांगल्या प्रतीचे होते. त्यांची सूर्यरेषा अखंड असून तिला एक फाटा फुटला आहे. ही सूर्यरेषा सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याकडे असलेली २ कौशल्ये दर्शवते. यामुळे त्यांना २ स्रोतांद्वारे लाभ मिळतो. (‘गुरुदेवांची कृपा हीच गेल्या २० वर्षांपासून आमची संपत्ती आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ ए. सद्गुरु डॉ. पिंगळे यांना शिवाचा आशीर्वाद असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावरील हृदयरेषा जेथे संपते, तेथे त्रिशूळाचे एक चिन्ह आहे. हे त्यांच्यामध्ये शिवाची ऊर्जा आणि शिवाची वैशिष्ट्ये असल्याचे द्योतक आहे. त्यांना शिवाचा आशीर्वाद होता, तसेच शिव त्यांचा मार्गदर्शक होता.

१ ऐ. सद्गुरु डॉ. पिंगळे हे विचारवंत, अनुभवी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्व असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या तळहातावरील मस्तकरेषा तीक्ष्ण आणि स्पष्ट असल्यामुळे त्यांचे विचार सुस्पष्ट होते. त्यांची स्मृती प्रबळ होती. ते एक विचारवंत, अनुभवी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्व होते. त्यांची मस्तकरेषा तीक्ष्ण असली, तरी तिची लांबी अल्प आहे. यावरून ‘ते त्यांच्या बुद्धीचा आवश्यकतेनुसार उपयोग करतात’, हे लक्षात येते. त्यांची हृदयरेषा ही मस्तकरेषेपेक्षा उठावदार असल्याने ते भावनिक स्तरावर निर्णय घेत असत. त्यामुळे लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. लोक त्यांचा आदर करत आणि त्यांच्यावर प्रेम करत.

(‘ज्या वेळी एखादी व्यक्ती मला प्रश्न विचारते, त्याच क्षणी त्या प्रश्नाचे उत्तर माझ्या मनात प्रकट होते. हा गुरुदेवांच्या कृपेचा चमत्कार मी नेहमी अनुभवत असतो. त्या उत्तरातून मलाच नवीन सूत्र शिकायला मिळते अन् ते इतरांसाठीही नवीन असते. ‘गुरुदेव मला आतून मार्गदर्शन करतात’, हे मी नेहमी अनुभवले आहे. मी शरणागतभावाने त्यांच्या पावन चरणांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ ओ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे गतजन्मातील जीवन परिपूर्ण असणे : त्यांच्या डाव्या तळहातावरील जीवनरेषा दीर्घ आणि तीक्ष्ण आहे, तसेच जीवनरेषेतून अनेक लहान रेषा वरच्या दिशेने जात आहेत. यावरून लक्षात येते की, त्यांचे गतजन्मातील जीवन परिपूर्ण होते. ते उत्साही आणि दीर्घायुषी होते. ते सभोवतालच्या परिस्थितीविषयी समाधानी होते.

(‘गुरुदेवांच्या चरणांशी पोचल्यानंतर मला समाधान मिळते आणि स्थिर वाटते.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ औ. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्यामध्ये विविध कौशल्ये आणि अंतर्ज्ञानशक्ती असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या तळहातावरील बुधरेषा ही भाग्यरेषेतून उगम पावली आहे. त्यामुळे सद्गुरु डॉ. पिंगळे यांना विविध कौशल्ये आणि अंतर्ज्ञानशक्ती यांचे वरदान लाभले होते. त्यांची कल्पनाशक्तीही प्रबळ होती.

(‘हे मी साधनेत अनुभवल्यामुळे माझी गुरुदेवांच्या पावन चरणांवरील श्रद्धा अधिकाधिक बळकट होत आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ अं. सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या हाताच्या बोटांच्या संदर्भातील विवेचन

१. सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा डाव्या हाताचा अंगठा लवचिक आहे. ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेत असले, तरी ते स्वतःच्या आकलनानुसार कृती करत

(‘साधनेच्या व्यतिरिक्त इतरांनी त्यांच्या इच्छेनुसार माझ्यासाठी काहीही करण्याची अनुमती मी त्यांना दिली होती. मला सनातनच्या आश्रमात मिळालेली साधनेची शिकवण आणि सनातन संस्थेकडून मिळत असलेले मार्गदर्शन यांनुसार मी सध्या आचरण करत आहे.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

२. त्यांच्या अंगठ्याचे वरचे पेर (बोटाचा भाग) हे त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दर्शवते.

३. त्यांच्या अंगठ्याला खालचे (तिसरे) पेर असल्यामुळे ते त्यांच्या जोडीदाराबद्दल समाधानी होते.

(‘हो. केवळ समाधानीच नाही, तर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने पत्नीने ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना चालू केल्याने मला कृतज्ञता वाटली.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

४. त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांची मधली पेरे ही त्यांच्यात हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्याची शक्ती दर्शवतात.

(‘माझ्यातील ‘हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याची क्षमता’ आणि अन्य सर्व वैशिष्ट्ये हे गुरुदेवांच्या कृपेचेच फलित आहे. त्याआधी माझ्या व्यावहारिक जीवनात ‘मला एखादी वस्तू विकत घेण्याविषयी काहीच ठाऊक नाही’, असे वाटून मी कधी भाजी किंवा स्वतःसाठी ‘शर्ट’ही खरेदी केला नव्हता.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

१ क. सद्गुरु डॉ. पिंगळे प्रत्येक कृती समर्पणभावाने करत असणे : सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या डाव्या हाताचा एकंदर विचार केल्यावर लक्षात येते की, ते परिश्रमी, व्यवहारी आणि निश्चयी होते. त्यांच्यात उत्तम निर्णयक्षमता होती.

(‘माझ्या विवाहाच्या अगोदर माझे आई-वडील माझ्यासंदर्भात सर्व निर्णय घेत असत अन् विवाहानंतर काही प्रमाणात माझी पत्नी निर्णय घेत असे. त्यामुळे माझ्यात निर्णयक्षमता अल्प होती; परंतु गुरुदेवांच्या कृपेने मला केंद्रसेवक, जिल्हासेवक, दैनिक ‘सनातन प्रभात’चा संपादक इत्यादी दायित्वे क्रमाक्रमाने देऊन मला निर्णय घेण्यास शिकवले. आतासुद्धा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून गुरुदेव मला शिकवत आहेत.’ – सद्गुरु डॉ. पिंगळे)

त्यांचे व्यक्तीमत्त्व पारदर्शक होते. ते प्रत्येक कृती समर्पणभावाने करत. ते आनंदाने जीवन जगत होते. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी जीवन ही एक शिकण्याची प्रक्रिया असल्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सुनीता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड. (६.५.२०२४)