Lebanon Pager Explosion : लेबनॉन पेजर स्फोटाच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या रिन्सन जोस याचे नाव चर्चेत !
जोस याच्या आस्थापनाच्या माध्यमातून लेबनॉनला विकण्यात आले होते पेजर्स !
नवी देहली – लेबनॉनमध्ये पेजरचा स्फोटाच्या प्रकरणी एका भारतीय वंशाच्या नागरिकाचे नाव चर्चेत आले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, केरळमदील वायनाड येथे जन्मलेला आणि सध्या नॉर्वेत रहाणारा रिन्सन जोस याचा लेबनॉनला पेजर पुरवठा करण्यात हात असल्याची चर्चा आहे. त्याच्या माध्यमातूनच हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना पेजरचा पुरवठा झाला होता. ‘गोल्ड अपोलो’ या आस्थापनाने बनवलेल्या पेजरमध्ये इस्रायलच्या गुप्तचर संघटनेने ३ ग्रॅम स्फोटके पेरली होती, असा आरोप आहे.
१. जोस याने २२ एप्रिल या दिवशी ‘नोर्टा ग्लोबल लिमिटेड’ आस्थापनाची स्थापना केली होती. हे आस्थापन बल्गेरियातील सोफिया येथे स्थित आहे. याच आस्थापनाची आता बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी होणार आहे. या आस्थापनाच्या माध्यमातून शेकडो पेजर्स हिजबुल्लाला विकण्यात आल्याचे समोर आले आहे.
२. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, नोर्टा आस्थापनाच्या बल्गेरियातील मुख्यालयाच्या पत्त्यावर २०० आस्थापनांची नोंदणी केलेली आहे; मात्र त्या ठिकाणी नोर्टा आस्थापनाचा कोणताही नामोल्लेख दिसत नाही. रॉयटर्सच्या प्रतिनिधीने भ्रमणभाषद्वारे जोस याच्याशी संपर्क साधून पेजर्सच्या व्यवहाराविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न देता भ्रमणभाष बंद केला.