Terrorists Inspirator Zakir Naik : भारतात जाणे सोपे आहे; पण तेथून बाहेर पडणे कठीण आहे ! – झाकीर नाईक

मलेशियात पळून गेलेला आतंकवाद्यांचा प्रेरणास्रोत झाकीर नाईक याचे भारतात परतण्‍याविषयीचे विधान

आतंकवाद्यांचा प्रेरणास्रोत झाकीर नाईक

कुआलालंपूर : मला भारतात जाणे फार सोपे आहे; पण तेथून बाहेर पडणे कठीण आहे, असे विधान भारताला हवा असलेला आणि अटकेच्‍या भीतीने मलेशियात पळून गेलेला आतंकवाद्यांचा प्रेरणास्रोत झाकीर नाईक याने केले. पाकिस्‍तानी यू ट्यूबर नादिर अली याने झकीर नाईक याची नुकतीच मुलाखत घेतली. यात नादिर अली याने झाकीर नाईक याला भारतात परतण्‍याविषयी विचारलेल्‍या प्रश्‍नाच्‍या उत्तरात नाईक याने वरील विधान केले. भारताने वर्ष २०१६ मध्‍ये झाकीर नाईक याच्‍या ‘इस्‍लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्‍थेवर बंदी घातली होती. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने त्‍याच्‍याविरुद्ध ‘यूएपीए’ या कायद्यांतर्गत गुन्‍हाही नोंदवला आहे.

झाकीर नाईक पुढे म्‍हणाला, ‘‘मी भारतात गेल्‍यावर मला ‘रेड कार्पेट’ अंथरले जाईल (स्‍वागत केले जाईल) आणि मला ‘आत ये आणि कारागृहात बस’, असे सांगितले जाईल. भारताच्‍या सूचीत मी पहिल्‍या क्रमांकाचा आतंकवादी आहे. माझ्‍यावरील सर्व आरोप खोटे आहेत. त्‍या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ‘बांगलादेशातील एक आतंकवादी माझा फेसबूक अनुयायी (फॉलोव्‍हर) होता आणि त्‍याने माझ्‍याकडून प्रेरणा घेतली होती’, असे सांगण्‍यात आले. प्रेरणा देणे आणि अनुयायी असणे, या वेगळ्‍या गोष्‍टी आहेत.’’

संपादकीय भूमिका

भारताला हव्‍या असलेल्‍या आरोपीला आश्रय देणार्‍या मलेशियाशी भारताने सर्व व्‍यापारी संबंध तोडून त्‍याला धडा शिकवायला हवा ! भारताने आजपर्यंत असे कठोर धोरण कधीही न अवलंबल्‍यामुळे छोटेसे फुटकळ देशही भारतावर दादागिरी करतात आणि जिहादी झाकीर याच्‍यासारख्‍यांचे फावते !