Gwalior Mid Day Meal : मध्यप्रदेशातील सरकारी शाळांतील माध्यन्ह भोजनाची दयनीय स्थिती मंत्र्यांसमोरच झाली उघड !

  • बटाट्याच्या आमटीत बटाटाच नाही !

  • मंत्र्यांकडून चौकशीचा आणि गुणवत्ता सुधारण्याचा आदेश

मध्यप्रदेश सरकारमधील ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकारमधील ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा येथे पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. पहाणीदौरा आटोपल्यानंतर तोमर यांनी  येथील पीएम्श्री शाळेला अचानक भेट दिली. ज्या वेळी ते शाळेत पोचले, तेव्हा विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनाची वेळ झाली होती. हे पहाता मंत्र्यांनीही विद्यार्थ्यांसमवेतच जेवण करण्याचा निर्णय घेतला आणि ते विद्यार्थ्यांच्या पंगतीत बसले. त्यांनी बादलीत असलेल्या बटाट्याच्या आमटीत बटाटा घेण्यासाठी चमचा घातला, तेव्हा चमच्यामध्ये एकही बटाटा आला नाही. मंत्री बादलीमध्ये बटाटा शोधत राहिले. यानंतर मंत्री तोमर काही न बोलता जेवण ग्रहण करू लागले. जेवता असतांनाच त्यांनी जिल्हा पंचायत मुख्याधिकार्‍यांना भ्रमणभाष करून शाळेतील माध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवरून सुनावले आणि तात्काळ गुणवत्ता सुधारण्याचा आदेश दिला.

प्रसारमाध्यमांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझी मंत्रीमहोदयांशी याविषयी चर्चा झाली आहे. त्यांनी मला भोजनाची गुणवत्ता सुधारण्यास सांगितले आहे. या प्रकरणी अन्वेषण करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाचा अहवाल येताच आम्ही संबंधितांवर कारवाई करू.

संपादकीय भूमिका

प्रशासन उंटावरून शेळ्या हाकत असल्याने त्याला वस्तूस्थिती कधीच ठाऊक नसते. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा त्यावर उपाय शोधले जातात, हेच यावरून पुन्हा लक्षात येते !