ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई – गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ईदच्या काळात डीजे, नाचणे आणि ‘लेझर’ दिव्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणार्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने वरील टिपणी केली अन् याचिका निकाली काढली.
‘ईदच्या मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपक आणि अन्य ध्वनीयंत्रणा यांच्या वापराला अनुमती न देण्याचे आदेश महापालिका आणि पोलीस यांना द्यावेत’, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ‘कुराण किंवा हदीस यांच्यात कोणत्याही उत्सवासाठी डीजे किंवा लेझर बीम वापरण्याची शिफारस नाही’, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.