शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !
|
सांगली, २० सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगांव गावातील ‘श्री बाल गणेश मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळा’ने विविध सजावट, रोषणाई, डॉल्बी ध्वनीक्षेपक यंत्रणा यांना फाटा देऊन पारंपरिक धार्मिक पद्धतीने आदर्श गणेशोत्सव साजरा केला आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि सनातन संस्थेचे साधक डॉ. प्रवीण कोळी यांनी विविध संकल्पना सुचवून आदर्श पद्धतीने हा उपक्रम राबवला आहे. यातून इतर गणेशोत्सव मंडळांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे.
सद्य परिस्थितीत गणेशोत्सवाचा मूळ उद्देश हरवल्याने त्याला दिखाऊ आणि बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. याला सामाजिक बांधिलकी जपणार्या काही गणेशोत्सव मंडळांचा सन्माननीय अपवाद आहे. त्यापैकी एक गणेशोत्सव मंडळ म्हणजे वाळवा तालुक्यातील शिगांव येथील ‘श्री बाल गणेश मित्र मंडळ’ ! यंदा श्री बाल गणेश मित्रमंडळाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे गणेशोत्सवाचा सुवर्णमहोत्सव साजरा करतांना व्यसनमुक्ती, गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेविषयी समाजप्रबोधन अन् जनजागृती हाच उद्देश डोळ्यांपुढे ठेवून आपल्या संस्कृतीला पूरक अशा गोष्टींचे मंडळाने नियोजन केले. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी पारंपरिक बँड बाजा, धनगरी ढोल वादन, पारंपरिक नृत्ये आयोजित केली. वारकरी, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, मंडळातील माहेरवाशीण महिलांचा सत्कार, ५० वर्षांपासून मंडळ उभारणीत अनमोल योगदान दिल्याविषयी मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार हे या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
विसर्जन मिरवणुकीत घोड्यांच्या बग्गीमध्ये श्री गणेश विराजमान होते, त्याच्यासमोर श्री विठ्ठलाची मूर्ती, गळ्यामध्ये टाळ असलेले लहान विठ्ठल भक्त वारकरी मुले या मिरवणुकीचे आकर्षण होते. पारंपरिक वारकरी पोशाखात स्त्री-पुरुष आणि आबालवृद्ध, युवती, मंडळातील कार्यकर्ते या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते, मिरवणुकीत महिला आणि पुरुष यांनी फुगड्या घातल्या. ध्वनीप्रदूषणमुक्त, गुलालविरहित, व्यसनमुक्त मिरवणूक हेच या मिरवणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल.
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी समाजात जागृती होण्याच्या उद्देशाने देखावा केला होता. गणेशोत्सवातील गैरप्रकार दूर होण्यासाठी समाजात जागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री बाल गणेश मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भक्तीमय वातावरणात मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते. बर्याच लोकांनी मिरवणुकीच्या वेळी ‘आपण पुष्कळ चांगले नियोजन केले आहे, तसे नियोजन प्रत्येक मंडळाच्या वतीने होणे आवश्यक आहे’, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
– डॉ. प्रवीण कोळी, अध्यक्ष, श्री बाल गणेश मित्र मंडळ, शिगांव.