चौकुळ गावातील अनेक वर्षांचा भूमी वाटपाविषयीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
|
सावंतवाडी – तालुक्यातील चौकुळ गावातील भूमीचा प्रश्न (कबुलायतदार गावकर प्रश्न) सोडवण्याच्या अनुषंगाने गावाने स्थापन केलेल्या ६५ लोकांच्या समितीला शासनाने मान्यता दिली आहे. या समितीने गावाच्या भूमीविषयी निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयावर जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही करावी, असा आदेश शासनाने पारित केल्याने चौकुळ ग्रामस्थांचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला भूमीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
याविषयीचा घटनाक्रम…
१. गेली २५ वर्षे हा प्रश्न रेंगाळत पडला होता. ग्रामस्थांसह विद्यमान शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी चौकुळ, आंबोली आणि गेळे या गावांतील भूमीचा (कबुलायतदार गावकर भूमी प्रश्न) प्रश्न सुटण्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला.
२. याला काही अंशी यश आले; मात्र पुढे कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे चौकुळ ग्रामस्थांनी ‘कबुलायतदार गावकर प्रश्न सोडवावा’, या मागणीसाठी नुकतेच आंदोलन केले, तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनीही प्रयत्न चालू केले. या वेळी मंत्री केसरकर यांनी ‘हा प्रश्न मार्गी लावू’, असे आश्वासन दिले होते.
३. त्यानंतर गावाने स्थापन केलेल्या समितीचे पदाधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला गेले होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनीही ‘यावर तोडगा काढू’, असे आश्वासन दिले होते.
४. मुंबई येथे १९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा महसूलमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गावाने ठरवलेल्या समितीला मान्यता देण्यात आली, तसेच त्या समितीला भूमी वाटपाचे सर्वाधिकार देण्यात आले.
५. त्यामुळे भूमीच्या वाटपाविषयी समितीच्या माध्यमातून गावाने एकमताने ठरवलेला निर्णय अंतिम होणार आहे. शासनाच्या निर्णयानंतर चौकुळ ग्रामस्थांनी २० सप्टेंबरला सावंतवाडी वैश्य भवन येथे आनंदोत्सव साजरा केला आणि येथे आलेले मंत्री केसरकर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
चौकुळ गावातील शेकडो ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.