मालवण येथील समुद्रात कर्नाटक राज्यातील अतीजलद नौकांद्वारे अवैधरित्या मासेमारी
मत्स्य विभागाच्या पाठलागानंतर ३० नौकांचे पलायन
मालवण – येथील समुद्रात मलपी, कर्नाटक येथील अतीजलद मासेमारी नौकांद्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे, तसेच स्थानिक मासेमारांच्या जाळ्यांची हानी केली जात आहे. याकडे स्थानिक मासेमारांनी वारंवार लक्ष वेधल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी गस्ती नौकेद्वारे या अतीजलद नौकांचा पाठलाग केला. या वेळी देवबाग, मालवण येथील समुद्रात मासेमारी करणार्या कर्नाटक येथील ३० हून अधिक नौकांनी पळ काढला.
या पार्श्वभूमीवर येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांना निवेदन देऊन कर्नाटक येथील अतीजलद नौकांद्वारे केलेल्या मासेमारीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.