मणीपूरमध्ये सैन्याची कारवाई आवश्यक !
मणीपूरमध्ये कुकी आणि मैतेई यांच्यातील संघर्ष पुन्हा चालू झाला आहे. मणीपूरमध्ये १० सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेला मोर्चा हिंसक झाला. पोलिसांनी लाठीमार, तसेच अश्रुधुराचा मारा केला. यात ४० विद्यार्थी घायाळ झाले. पंगपोकी जिल्ह्यात २ सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला, तर थंगबू खेड्यात जमावाने काही घरे जाळल्याने ग्रामस्थांना गावाबाहेर पळ काढावा लागला, तसेच ३ जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली. ‘मणीपूरमध्ये कुकी आणि मैतेई यांच्या संघर्षात ‘ड्रोन’ अन् अत्याधुनिक क्षेपणास्त्र यांचा वापर करून आक्रमणे करण्यात येत आहेत’, असे पोलिसांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये अत्याधुनिक ड्रोन्सविषयी आलेल्या बातम्या अतीरंजित आहेत. आकाशात उडणारी काही ड्रोन्स ही टेहळणी करणारी होती. ‘आसाम रायफल्स’चे निवृत्त महासंचालक जनरल पी.सी. नायर यांनी कुकी आणि मैतेई यांच्यातील आक्रमणात रॉकेट किंवा ड्रोन यांचा वापर केला जात नसल्याचे म्हटले आहे.
नुकतीच एक ध्वनीमुद्रित फीत (क्लिप) प्रसारित झाली, ज्यामध्ये मणीपूरचे मुख्यमंत्री कुकी समुदायाविषयी अतिशय आक्रमक भाषेमध्ये बोलत होते. त्यामुळे कुकी समुदायाला भीती वाटू लागली. नंतर मणीपूर सरकारने सांगण्याचा प्रयत्न केला की, ‘ही ध्वनीमुद्रित फीत खरी नव्हती’; परंतु तोपर्यंत हानी झाली होती की, जी भरून काढता आली नाही. आता कुकी समुदायाला केवळ ‘कुकी लँड’ (कुकींसाठी वेगळी भूमी) पाहिजे आणि मैतेयी समाजातील असलेले मुख्यमंत्री अन् नेते यांचे म्हणणे आहे की, ‘आतंकवादविरोधी अभियान’ हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आणले पाहिजे, जे अत्यंत धोकादायक होईल. इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.’ निवडून आलेल्या २ खासदारांचे स्वतःच्या घराबाहेर पडण्याचेही धाडस नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांत महत्त्वाचे आहे, तिथे असलेली अराजकता आणि हिंसाचार थांबवणे. ‘आतंकवादविरोधी अभियान’ हे केवळ भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालीच आणायला पाहिजे, जे दोन्ही समुदायांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकू शकते.
१. ‘मणीपूर पोलीस’, ‘मणीपूर रायफल’ आणि अर्धसैनिक दले यांची स्थिती
आज अनेक सुरक्षादले मणीपूरमध्ये आहेत. ‘मणीपूर पोलीस’ आणि ‘मणीपूर रायफल’ यांनी त्यांच्याकडे असलेली ४ सहस्रांहून अधिक रायफल न लढता अराजकीय तत्त्वांना देऊन टाकली, ज्यामुळे हे आतंकवादी एकमेकांना मारत असतात. स्वतःची हत्यारे शत्रूला दिल्याची एकसुद्धा घटना गेल्या ५० वर्षांमध्ये भारतीय सैन्यात घडलेली नाही. मणीपूर पोलीस हे त्यांच्या जातीजमातीप्रमाणे आपापल्या अराजकीय तत्त्वांना साहाय्य आणि त्यांच्यासह हिंसाचार करतांना पकडले गेले आहेत. पोलीस नेतृत्व ‘कंट्रोल रूम’च्या (नियंत्रण कक्षाच्या) बाहेर जायला सिद्ध नाही. धोकादायक परिस्थितीमध्ये पोलिसांचे नेतृत्व हवालदार करत आहेत. मणीपूरमध्ये मोठ्या संख्येने जी अर्धसैनिक दले आली आहेत, त्यांचा उपयोग आक्रमक कारवाईकरता होत नाही. ही अर्धसैनिक दले ‘जगा आणि जगू द्या’, हे तत्त्व वापरतात.
२. भारतीय सैन्याच्या मोहिमेमधील अडथळे
मणीपूरमध्ये झालेल्या ‘सीझ फायर’ (शस्त्रसंधी) करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांसह छावणीमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथून अनेक शस्त्रे गायब झाली आहेत, ती परत आली पाहिजेत. भारत सरकारने ‘अरामबाई टेंगगोलला’ या मैतेयी जहाल संघटनेच्या हिंसक कारवाया थांबवल्या पाहिजेत, तरच राज्यात शांतता निर्माण होऊ शकते. सध्या कुकी गट हिंसाचार करत आहेत आणि मैतेयी स्वतःचे रक्षण करत आहेत. कुकी गट मैतेयी गटांवर प्रतिआक्रमण करून सूड घेत आहे. कुकी आणि मैतेयी जमातींमध्ये एकमेकांविषयी प्रचंड द्वेष आहे. मणीपुरी युवक स्वभावतः आक्रमक असतात, चांगले सैनिक बनू शकतात; परंतु सध्या त्यांची शक्ती एकमेकांना मारण्यावर व्यय केली जात आहे. हिंसाचारामध्ये महिलासुद्धा सामील आहेत, ज्यांना ‘मीरा पायबी’ म्हटले जाते. या महिला गटांनी ‘आसाम रायफल्स’च्या छावण्यांना अनेक ठिकाणी वेढा घातला होता, ज्यामुळे ‘आसाम रायफल्स’च्या सैनिकांना त्यांच्या छावणीच्या बाहेर येणे कठीण होते. अनेक वेळा पकडलेल्या आतंकवाद्यांना ‘मीरा पायबी’ गटांनी घेरल्यामुळे भारतीय सैन्याला त्यांना सोडून द्यावे लागत आहे. ‘मीरा पायबी’चे भारतीय सैन्याच्या मोहिमेमध्ये अडथळे थांबवलेच पाहिजेत, अन्यथा सैन्य काम करू शकणार नाही.
३. सरकारने सैन्याला विशेषाधिकार देण्याची आवश्यकता !
मणीपूरमधील अशा कठीण परिस्थितीवर मात करून भारतीय सैन्य तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे. मणीपूर खोर्यामध्ये ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट’ (सैन्याला विशेषाधिकार देण्यासाठीचा कायदा) हा लागू केला पाहिजे, ज्यामुळे सैन्याला त्यांची मोहीम सक्षमपणे राबवता येतील.
४. सैन्य आणि सरकार यांनी करावयाची कृती
मणीपूरचे पोलीस नेतृत्व त्यांच्या कर्तव्य करण्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे. त्या जागी निधड्या छातीच्या सैनिकी नेतृत्वाची आवश्यकता आहे की, जे सैनिकांसह धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊन भारतीय सैनिकांचे नेतृत्व करतील आणि परिस्थिती सामान्य करतील. मणीपूर जनतेचा केवळ भारतीय सैन्यावरच विश्वास आहे, त्यामुळेच प्रत्येक वस्ती ‘आमच्या जवळ सैन्याला तैनात करावे’, असे म्हणत आहे. ‘सैन्याच्या दिमापूरस्थित ‘३ कोर’च्या नेतृत्वाखाली सगळ्या सुरक्षादलांना आणले जावे आणि सुरक्षादलांचा वापर कसा केला पाहिजे’, हे ‘३ कोर’ने ठरवावे.
‘पुढचे काही दिवस मणीपूरमध्ये सैन्य वाढवून सीमा सुरक्षित केल्या पाहिजेत, ज्यामुळे नवीन शस्त्र, दारूगोळा मणीपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोध मोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्रे परत मिळवली पाहिजेत. कुठल्याही शस्त्रधारी गटांशी संवाद होऊ शकत नाही; मात्र त्याच वेळी स्थानिक पातळीवर कुकी आणि मैतेई यांच्याशी संवाद चालू करणे अत्यावश्यक आहे. चर्चेची द्वारे खुली केल्याविना हा वांशिक संघर्ष आटोक्यात येणार नाही’, हेही महत्त्वाचे !
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.