पाकिस्तानात चीन सैन्य तैनात करणार !
भारताला निर्माण होणार धोका
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान आणि चीन संयुक्त सुरक्षा आस्थापन स्थापन करण्यासाठी करार करणार आहेत. या करारामुळे पाकिस्तानात चिनी सैन्याच्या तैनातीचा मार्ग मोकळा होणार आहे. करारानंतर चिनी सैनिक पाकिस्तानमध्ये काम करू शकतील. या करारानंतर चिनी नागरिकांची चिलखती वाहनांतून वाहतूक करता येणार आहे. सहस्रो चिनी नागरिक पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत.
१. चीनचे म्हणणे आहे की, हा सुरक्षा करार पाकिस्तानमध्ये रहाणार्या सहस्रो चिनी नागरिकांचे संरक्षण करेल; कारण अनेक प्राणघातक आतंकवादी आक्रमणांमुळे त्यांची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.
२. चीन पाकिस्तानच्या माध्यमातून भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तज्ञांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान आधीच चीनच्या साहाय्याने पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तानसह अनेक भागांत वेगाने सैनिकी पायाभूत सुविधा भक्कम करत आहे.