सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
आपण कुणाकडे काही मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो; पण एखाद्याने आपल्याला काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही आणि जीवनातील साधनेचे महत्त्व !
कु. रजनीगंधा कुर्हे : परम पूज्य, आपण कुणाकडे काही मागू नये; पण जर कुणी आपल्याला स्वतःहून काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो; पण एखाद्याने आपल्याला न मागता काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. (‘आपण दुसर्याकडे काही मागतो, तेव्हा ती आपली इच्छा असते; म्हणून देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो आणि तो या किंवा पुढील जन्मी फेडावा लागतो. कोणतेही कर्म केले, तरी त्याचे फळ (पाप किंवा पुण्य) भोगावेच लागते. याउलट साधना आपल्याला ‘अकर्म कर्म’ करायला शिकवते. ‘अखंड नामजप करत सर्व कृती करणे’, यामुळे कोणत्याही कृतीचा संस्कार आपल्या चित्तावर होत नाही. तसेच ‘प्रत्येक कृती आपल्या हातून ईश्वरेच्छेने घडत आहे’, हा भाव मनात सतत ठेवणे, यामुळेही आपल्या चित्तावर संस्कार होत नाही. अशा प्रकारे आपल्या हातून ‘अकर्म कर्म’ घडते आणि त्यामुळे देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. अकर्म कर्म घडल्याने आपली चित्तशुद्धी होते. हेच जीवनातील साधनेचे महत्त्व आहे !’ – संकलक)
संतांप्रमाणे देव माझीही काळजी घेणार असल्याने ‘पूर्णवेळ साधना करणे’, हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे’, असे सांगणार्या कु. रजनीगंधा कुर्हे !
एकदा माझे एक नातेवाईक आणि माझ्यात पुढील संभाषण झाले.
नातेवाईक : तू पूर्णवेळ साधिका आहेस. तुला शारीरिक त्रास आहेत आणि तुझी काळजी घ्यायला तुझ्या पुढे-मागे कुणी नाही. तुझ्यासारखे आश्रमात आणखी किती जण आहेत ?
मी (कु. रजनीगंधा कुर्हे) : काही जण आहेत.
नातेवाईक : तू तुझ्या आयुष्याचा ‘प्लान ए’ (टीप १) आणि त्याला पर्यायी ‘प्लान बी’ (टीप २) तयार ठेवला नाहीस का ?
मी (कु. रजनीगंधा कुर्हे) : ज्या वेळी मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात आले, तेव्हाही मी ‘प्लान ए’ ठेवला होता आणि अजूनही ‘प्लान ए’च आहे. माझ्यासाठी ‘प्लान बी’ नाहीच; कारण जसे संत जनाबाई आणि भक्त प्रल्हाद यांनी ईश्वरचरणी जीवन समर्पित केले होते आणि देवाने त्यांची सगळी काळजी घेतली, तशीच देव माझीही काळजी घेईल.
टीप १ – प्लान ए : पूर्णवेळ साधना करणे
टीप २ – प्लान बी : नाेकरी आणि विवाह करणे
नातेवाइकांनी मला हा प्रश्न विचारल्यावर माझ्याकडून आपोआपच उत्तर दिले गेले; मात्र नंतर माझ्या मनात विचार आला, ‘खरेतर त्यांनी आजपर्यंत हा प्रश्न कधी विचारला नव्हता.’ मग मला वाटले, ‘देवाने माझ्या मनाची परीक्षा घेतली का ?’ नंतर माझ्या मनात आले, ‘प्रश्नही देवाचाच आणि उत्तरही देवाचेच !’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२४)