वर्ष २०२४ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

१. विविध शक्ती आणि त्यांच्या व्याख्या

१ अ. मनःशक्ती : ‘ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती स्वेच्छेने कृती करते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘मनःशक्ती’, उदा. क्रांतीकारक भगत सिंग, खेळाडू सचिन तेंडुलकर, नेते इत्यादी.

१ आ. चित्तशक्ती : ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करतांना व्यक्ती परेच्छेने किंवा धर्मनियमानुसार वागते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘चित्तशक्ती’, उदा. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद इत्यादी.

१ इ. आत्मशक्ती : ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्ती ईश्वरेच्छेने वागते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘आत्मशक्ती’, उदा. छत्रपती शिवाजी महाराज.

५० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असलेले जीव मनःशक्तीच्या, ५० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले जीव चित्तशक्तीच्या, तर ७१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले जीव आत्मशक्तीच्या स्तरावर कार्य करतात.

२. वर्ष २०२४ पूर्वी झालेल्या आणि वर्ष २०२४ मध्ये झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थित हिंदुत्वनिष्ठ अन् त्यांच्या शक्तीचा स्तर (टक्के)

वर्ष २०२४ च्या पूर्वी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनां’त किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवां’त चित्तशक्ती आणि आत्मशक्ती यांच्या एकूण (३० + १० = ४० टक्के) स्तरावर कार्य करण्याच्या तुलनेत मनःशक्तीच्या (६० टक्के) स्तरावर कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ अधिक सहभागी होते, याउलट वर्ष २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मनःशक्तीच्या (४५ टक्के) तुलनेत चित्तशक्ती आणि आत्मशक्ती यांच्या एकूण (४० + १५ = ५५ टक्के) स्तरावर कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ अधिक प्रमाणात सहभागी झाले होते.

३. हिंदुत्वनिष्ठांना मनःशक्तीच्या स्तराकडून चित्तशक्तीच्या स्तरावर नेणारा महोत्सव

श्री. निषाद देशमुख

‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ किंवा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांत हिंदुत्वनिष्ठांना त्यांची प्रकृती आणि आवड यांनुसार साधना करण्यास सांगितले जाते. या नियमित प्रबोधनामुळे हळूहळू काही हिंदुत्वनिष्ठ साधनेचे चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मनःशक्तीकडून चित्तशक्तीच्या स्तरावर जाण्यास साहाय्य होते.

४. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदुत्वनिष्ठांनी नामजप केल्याने होणारे परिणाम

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात विविध सत्रे चालू करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा ध्वनीमुद्रित सात्त्विक नामजप काही काळासाठी लावण्यात येतो. हिंदुत्वनिष्ठांनी हा नामजप केल्यावर त्यांचा मनःशक्तीपासून चित्तशक्तीच्या टप्प्याला प्रवास होतो. त्यामुळे पुढील लाभ होतात.

अ. सभागृहाच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने अनिष्ट शक्तींना वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहजतेने अडथळे आणता येत नाहीत.

आ. हिंदुत्वनिष्ठांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने त्यांना सहजतेने अनुभूती येण्यास साहाय्य होते.

इ. व्यक्ती आणि वायूमंडल यांच्या सात्त्विकतेत वाढ झाल्याने विषयाचे प्रस्तुतीकरण अन् श्रोत्यांना त्याचे आकलन सहजतेने होते.’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ : २४.६.२०२४, सकाळी १०.३० (१ मिनिट), ज्ञानाच्या  टंकलेखनाचा दिनांक आणि वेळ : २९.६.२०२४, सकाळी ११.५० ते दुपारी १२.१५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.