संपादकीय : तिरुपतीच्या पावित्र्याला कलंक !
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपानंतर उघड झाले आहे. बालाजीभक्तांसाठी पूजनीय, वंदनीय आणि पवित्र असणार्या तिरुपतीसारख्या तीर्थक्षेत्री असा प्रकार होणे संतापजनक आहे. या लाडवांमध्ये डुकराची चरबी आणि माशांचे तेल वापरले गेल्याचे प्रयोगशाळेतून सिद्ध झालेल्या अहवालातून समोर आले आहे. हा संपूर्ण देशाला बसलेला मोठा हादराच आहे. हे सर्व घडले आहे, ते वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात ! ‘अन्नदानम्’ अर्थात् जे अन्नदान मंदिराकडून केले जाते, त्याचा दर्जाही तत्कालीन काँग्रेसच्या काळात खालावला होता. हा सगळा प्रकार म्हणजे तिरुपतीच्या पावित्र्याचे हनन आणि कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी करण्यात येणारा खेळच होय. हे सर्व पुष्कळ भयानक आणि तितकेच घृणास्पद आहे. एकप्रकारे अप्रामाणिकतेने गाठलेला उच्चांक आहे. याविषयी तेलंगाणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह म्हणाले, ‘‘हा प्रकार म्हणजे आमच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशावरील थेट आक्रमणच आहे.’’ वर्तमान सरकार आता शुद्ध तुपातील लाडू बनवत असून मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणार्या भोजनाचा दर्जाही सुधारला असल्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
भूतलावरील वैकुंठ मानले जाणारे तिरुपती हे एकमेव तीर्थक्षेत्र आहे. ‘कलियुगात भक्तांच्या साहाय्यासाठी भगवान श्रीविष्णूने येथे व्यंकटेश्वराच्या रूपात अवतार घेतला होता’, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. असे असतांना खेदाची गोष्ट म्हणजे हे मंदिर हिंदूंच्या, पर्यायाने भक्तांच्या नव्हे, तर सरकारच्या कह्यात गेले आहे. त्यात नंतर तेथे ख्रिस्ती अधिकारी नेमण्यात आले. अर्थात् तत्कालीन वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षच ख्रिस्तीधार्जिणा असल्याने हे होणारच होते. मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने चर्चही बांधण्यात आली आहेत. लाडवांचे प्रकरण आता समोर आले; पण याआधी तिरुपती मंदिरात दान केल्या जाणार्या केसांची चीनमध्ये तस्करी केली जात असल्याचेही उघड झाले होते. त्यामागेही तत्कालीन वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षातील नेत्यांचा सहभाग होता.या केसांचा उपयोग ‘विग’ (खोटे केस) बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा व्यापार संपूर्ण जगभरात पसरला आहे. हे सर्व काय दर्शवते ? हिंदू आणि हिंदु धर्मीय यांच्या विरोधात द्वेषापोटी पद्धतशीरपणे रचलेले हे भयावह षड्यंत्रच आहे. हिंदु धर्मावर उघडपणे केलेले आक्रमणच आहे. इतिहास पाहिल्यास पुण्यभूमी असणार्या भारतात परकीय आक्रमक, तसेच अन्य पंथीय यांनी प्रत्येक वेळी हिंदूंच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांच्या नावाखाली आजवर प्रत्येक वेळी हिंदूंनाच डावलले गेले आहे, हे दुर्दैवी आहे. हिंदुद्वेषाची ही वळवळणारी कीड वेळीच नियंत्रणात आणायला हवी. अन्यथा आज जे तिरुपतीच्या संदर्भात घडले, ते भविष्यात देशभरातील अन्य मंदिरांमध्येही होण्यास वेळ लागणार नाही. तिरुपतीमधील लाडवांच्या भ्रष्टतेच्या विरोधात आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले, ‘‘घडलेल्या प्रकारामुळे आम्ही सर्वच जण त्रस्त आहोत. भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व सूत्रांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपातील अवमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.’’ हिंदु धर्मरक्षणासाठी कृतीशील होण्याविषयी आवाहन करणारे पवन कल्याण यांचे अभिनंदन ! हिंदूंनीही त्यांना पाठिंबा द्यावा.
हिंदूंचे दायित्व !
अशा प्रकारे सरकारीकरण झालेल्या मंदिरात प्रतिदिन लाखोंच्या संख्येत येणार्या हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालून आणि त्यांना अशुद्ध गोष्टी खायला देऊन त्यांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. हिंदूंचा इतका मोठ्या प्रमाणात विश्वासघात करणार्यांच्या विरोधात भारत सरकार कारवाई कधी करणार ? अहवालातून सत्य उघड होऊनही ना अद्याप कुणाला अटक करण्यात आली, ना कुठे हिंदूंचा आक्रोश दिसून आला ! खरेतर प्रत्येक हिंदूच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी आणि प्रसादाच्या विटंबनेच्या विरोधात संघटित होऊन तिरुपती प्रशासन अन् तत्कालीन सरकार यांना खडसावायला हवे. ऐतिहासिक काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर क्रांतीकारक मंगल पांडे यांनी देशव्यापी चळवळ उभारली होती. ती प्रेरणा हिंदू कधी घेणार ?
अन्य धर्मियांच्या खाद्यपदार्थांच्या संदर्भात जशी प्रमाणपत्रे ठेवण्यात आली आहेत, तशीच प्रमाणपत्रे हिंदूंनीही आता त्यांच्या धार्मिक खाद्यपदार्थांच्या दृष्टीने ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. तसे केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. तिरुमला तिरुपती देवस्थानने अयोध्येला २५ ग्रॅम वजनाचे १ लाख लाडू पाठवण्याचा संकल्प केला आहे. हे लाडूसुद्धा कशा प्रकारे बनवण्यात आले आहेत ? याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. अयोध्या येथे श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी १ लाख लाडू पाठवण्यात आले होते. ते लाडू सर्व साधू-संत, महंत यांनी ग्रहण केले होते. त्यामुळे हा श्रीरामभक्तांचाही केलेला विश्वासघातच आहे. अशुद्ध प्रसाद बनवणारे आणि तो विकणारे हिंदूच होते. त्यांना कुणालाच हा भ्रष्टाचार कसा समजला नाही ? तेथील पुजार्यांच्याही हे लक्षात कसे आले नाही ? अशा प्रकारे पापात भागीदार झालेल्यांनाही न्यायालयाने कठोर शिक्षा करावी, ही भाविक हिंदूंची अपेक्षा आहे. जर या प्रक्रियेमध्ये सर्वच जण परधर्मीय असतील, तर त्यांनी याकडे डोळेझाकच केली असेल; पण मग तिरुपतीमधील या परधर्मीय साखळीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
हिंदुद्वेषी, विभाजनवादी, निधर्मीवादी, समाजवादी, मार्क्सवादी, गांधीवादी विचारसरणी असणारेच या सगळ्याला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदू आणि हिंदु धर्म होरपळला जात आहे. लाडवांच्या प्रकारामुळे भाविकांनी भविष्यात बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला येणे नाकारले, तर या तीर्थक्षेत्राला किती मोठी हानी सहन करावी लागेल, याचा विचारच न केलेला बरा ! हे आता थांबायला हवे. हिंदूंनो, मंदिरे हा आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा, तसेच आध्यात्मिक वैभव आहे. त्यामुळे ते जपायलाच हवा. देशभरातील सर्वच मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासाठी ठिकठिकाणी ‘मंदिरमुक्ती’ मोहीम राबवायला हवी. हिंदूंची मतपेटी बळकट करून सर्वांनी एकजुटीने कार्य करायला हवे. हिंदु धर्माला नष्ट करू पहाणार्यांच्या विरोधात ‘हिंदूसंघटन’ हीच काळाची आवश्यकता आहे.
भारतातील मंदिरांशी संबंधित सूत्रांवर विचार करण्यासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करणे, हा कृतीशील आणि धर्मसुसंगत उपाय होय ! |