Narendra Modi : काँग्रेसकडून हिंदूंची श्रद्धा आणि संस्कृती यांचा वारंवार अपमान ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
|
वर्धा – काँग्रेसने नेहमीच आमची श्रद्धा आणि संस्कृती यांचा अपमान केला आहे. काँग्रेसवाल्यांनी तर कर्नाटकमध्ये गणपतिबाप्पालाही थेट कारागृहात टाकले होते. काही लोकांकडून पूजली जाणारी श्री गणेशमूर्ती काँग्रेसींनी पोलीस ज्या वाहनातून आरोपींना नेतात, त्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेली. काँग्रेसने नेहमीच ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवादाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा अप्रामाणिक आणि भ्रष्टाचारी यांचा पक्ष आहे. एका समाजाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. ते २० सप्टेंबर या दिवशी वर्धा दौर्यावर होते. येथे त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले…
१. ‘तुकडे-तुकडे’ टोळीचे लोक आणि शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वांत भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो.
२. गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे. महाराष्ट्राची भूमी त्याची साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला; पण काँग्रेसने मात्र या गणेशोत्सवाचा तिरस्कार केला आहे. अलीकडेच मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते पाहून काँग्रेसचा जळफळाट झाला. त्यांच्यातील तुष्टीकरणाचे भूत जागे झाले. त्यांनी गणेशपूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला.