श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
गोवंश रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान देण्याची प्रमुख मागणी
पुणे, १९ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे. देशी गोवंशियांची कत्तल सतत चालू आहे. गोशाळांच्या आर्थिक समस्या पुष्कळ आहेत. राज्यात शेती आणि आरोग्य यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गोवंशियांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावे, ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या ४ राज्यांमध्ये देशी गोवंशियांच्या पालनासाठी अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र या राज्यांपेक्षा प्रगत राज्य आहे. तरीही राज्यात देशी गोवंशियाला अनुदान देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आमरण उपोषण करण्याचा निर्णय नाईलाजाने घेण्यात आला आहे. राजकीय दृष्टीकोनातून आम्ही महायुतीचेच समर्थक आहोत; परंतु गोमातेच्या आस्थेपोटी शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. आळंदी येथील गोपाळपुरामधील मारुति मंदिर संस्थान येथे अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
सर्वश्री मिलिंद एकबोटे, ह.भ.प. सुनील महाराज नरघडे, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे आणि कृष्णाजी कोंदाळकर यांच्यासह अनेक गोरक्षक आणि गोशाळाचालक या उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत.
प्रमुख मागण्या
१. देशी गोवंशासाठी प्रतिदिन, प्रति गोवंश १०० रुपये अनुदान मिळावे.
२. राज्यातील गायरानाची भूमी गोपालन आणि चारा लागवड यांसाठी उपलब्ध करून द्यावी.
३. रस्त्यावरील मोकाट फिरणार्या गोवंशियांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी.