प्रसंगांत मानसिक स्तरावर राहिल्याने साधिकेची झालेली हानी आणि प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावर रहात असल्याने साधिकेला होत असलेले लाभ !

सौ. रूपाली वर्तक

१. प्रसंगांत भावनिक स्तरावर रहात असल्यामुळे झालेली हानी

‘काही प्रसंगांमुळे माझ्या मनाची अस्वस्थता वाढून मनाची ऊर्जा व्यय होत आहे, तसेच त्याचा परिणाम दैनंदिन साधनेच्या प्रयत्नांवर होत आहे. मी अनेक वर्षे साधनेत असूनही काही ठराविक प्रसंगांत मी भावनिक स्तरावर रहात असल्यामुळे मला वाईट वाटते किंवा दुःख होते’, असे प्रकर्षाने माझ्या लक्षात आले. त्यामुळे ‘प्रत्येक प्रसंगात मला आध्यात्मिक स्तरावर रहायचे आहे’, हे मनावर अधिक बिंबले. मला इतके दिवस हे सूत्र ठाऊक नव्हते, असे नाही. ‘मी आतापर्यंत अनेक वेळा स्वतःला किंवा इतरांना आध्यात्मिक स्तरावर रहाण्यासाठी दृष्टीकोन दिले आहेत. अनेक संघर्षाच्या प्रसंगांत तसा प्रयत्नही देवाने माझ्याकडून करून घेतला आहे, तरीही ‘काही प्रसंगांत मला वाईट वाटते’, याचा अर्थ मी ‘मानसिक स्तरावर त्या प्रसंगाला सामोरे जात आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२. आध्यात्मिक स्तरावर राहिल्याने झालेले लाभ

‘आध्यात्मिक स्तरावर विचार करायचा’, असा नुसता विचार आल्यावर एका क्षणात माझ्या मनाच्या स्थितीत पालट होतो.

अ. ‘देवाच्या जवळ जाता येते’, हे लक्षात येते. त्यामुळे माझे मन लगेच स्थिर होते.

आ. माझ्याकडून अधिक योग्य विचार होतो आणि त्या प्रसंगामुळे मला वाटत असलेली अस्वस्थता लगेच नष्ट होते.

इ. ‘वाईट वाटणे’, हे अहंचे लक्षण आहे. आध्यात्मिक स्तरावर विचार केल्याने स्वतःतील अहं न्यून होतो.

ई. नकारात्मकता दूर झाल्याने आनंद मिळताे आणि उत्साह वाढतो.

‘आम्ही शिकत नाही, तोपर्यंत गुरुदेव हे सर्व पुनःपुन्हा विविध माध्यमांतून शिकवत आहेत’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१०.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक