वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !
हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचे वाघोली येथील खाणीमध्ये पुनर्विसर्जन !
शिवणे (पुणे) – वारजे, कर्वेनगर येथील प्रभाग क्र. १३, ३१, ३२, ४२, तसेच नव्याने समाविष्ट न्यू कोपरे आणि कोंढवे-धावडे या सर्व प्रभागांत एकूण ३० ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद, टाक्या यांची व्यवस्था केली होती. या ठिकाणी १० दिवसांत ४२ सहस्र ४९४ मूर्तींचे हौदात विसर्जन झाले. त्यासाठी ८ बांधीव हौद, ७३ टाक्या आणि ९ ठिकाणी मूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे मूर्ती संकलन केंद्रांवर एकूण ५१३ मूर्तीं संकलित करण्यात आल्या. हौदामध्ये २४ घंटे पाणी उपलब्ध राहील, यासाठी चार टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जन झालेल्या मूर्तींचे वाघोली येथील खाणीमध्ये पुन्हा विसर्जन करण्यात आले. (कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्ती काढण्यासाठी जेव्हा शासकीय कर्मचारी त्यात उतरतात, तेव्हा त्यांच्या पायाखाली अनेक गणेशमूर्ती अवयव भंग होऊन त्यांची विटंबना होते. हे अत्यंत गंभीर असून हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावणारे आहे. या मूर्ती खाणीमध्ये नेल्या जातात आणि तिथे यंत्राद्वारे विसर्जित केल्या जातात. त्यांना तिथे अयोग्य पद्धतीने टाकले जाते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींचा अवमान होतो. – संपादक)
‘पं. दीनदयाळ उपाध्याय शाळे’मध्ये संकलन केंद्रावर शाडू मातीच्या मूर्तीची एकूण २ टन शाडू माती जमा झाली आहे. ती शाडू माती पुनर्निर्माणासाठी ‘पूर्णम इकोव्हिजन’ यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.