हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कांचीपूरम् (चेन्नई) येथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते ‘श्री सत्यदत्त पूजे’ची सांगता !
कांचीपूरम् (चेन्नई) – भाद्रपद पौर्णिमेच्या तिथीवर, म्हणजेच १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांचीपूरम् येथील त्यांच्या निवासस्थानी ‘श्री सत्यदत्त पूजा’ केली. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. प्रभाकरन्, पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची वंदनीय उपस्थिती लाभली. याचसमवेत कांचीपूरम् येथील बांधकाम व्यावसायिक श्री. प्रकाशजी, अधिवक्ता (श्री.) ज्योतीरामनजी, ‘कांचीपूरम् सिल्क साडी’चे व्यापारी श्री. श्रीनिवासनजी यांच्यासह कारई गावातील अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती. या पूजेचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले.
‘श्री सत्यदत्त पूजे’विषयी…
जुलै २०२४ मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दत्तावतारी संत प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेंब्येस्वामी यांचा दृष्टांत झाला. या वेळी स्वामींनी त्यांना सर्व साधकांच्या त्रासांच्या निवारणासाठी सलग ३ पौर्णिमा ‘श्री सत्यदत्त पूजा’ करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे पहिली पूजा गुरुपौर्णिमेला गोव्यात, तर दुसरी पूजा बेंगळुरू येथे पार पडली. तिसरी पूजा भाद्रपद पौर्णिमेला कांचीपूरम् (श्री कामाक्षीदेवी क्षेत्र, तमिळनाडू) येथे पार पडली. अशा प्रकारे सलग ३ पौर्णिमा ‘श्री सत्यदत्त पूजा’ करून या पूजेची सांगता करण्यात आली.
ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा करतो, त्याचप्रमाणे मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी श्री सत्यदत्त पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेनंतर जशी सत्यनारायणाची कथा श्रवण करतो, त्याचप्रमाणे श्री सत्यदत्त कथा श्रवण केली जाते.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. ‘कांचीपूरम् सिल्क साडी’चे व्यापारी श्री. श्रीनिवासनजी हे रामेश्वरम् येथील २२ तीर्थकुंड आणि त्याच ठिकाणी असलेले कोटी तीर्थ यांचे तीर्थ घेऊन १८ सप्टेंबर या दिवशी सकाळी पूजेच्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांनी ते तीर्थ भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी दिले. ‘श्री सत्यदत्त पूजे’ची सांगता असतांना त्याच दिवशी सर्व नद्यांचे तीर्थ मिळणे, याचाच अर्थ पूजा केल्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळाले’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.
२. कांचीपूरम् येथील बांधकाम व्यावसायिक श्री. प्रकाशजी १८ सप्टेंबर या दिवशी पहाटे श्री तिरुपति बालाजीचे दर्शन घेऊन आले. ‘श्री सत्यदत्त पूजे’साठी येतांना त्यांनी तिरुपति बालाजीचा लाडू प्रसाद म्हणून सर्वांसाठी आणला होता.
‘वरील दोन्ही दैवी अनुभूतींमधून असे लक्षात आले की, रामेश्वरम् येथील शिव, तिरुपति येथील विष्णु आणि ‘श्री सत्यदत्त’ पूजेतील भगवान दत्त या तिन्ही देवता तीर्थ अन् प्रसाद रूपात ३ देवतांच्या रूपात उपस्थित राहिल्या’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.
३. पूजेची सांगता होत असतांना दत्तमूर्तीला वाहिलेले बिल्वपत्र आणि विष्णुतुळस हे खाली पडले. यातून भगवान दत्तात्रेयांनी पूजा सुफळ संपूर्ण झाल्याचा आशीर्वाद दिल्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवले.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |