कणकुंबीनंतर आता नेर्से, खानापूर येथून पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या हालचाली

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – म्हादईचे पाणी कणकुंबी येथून कर्नाटकमध्ये मलप्रभा नदीत वळवण्याचे काम पूर्ण केल्यानंतर आता कर्नाटकने कळसा आणि भंडुरा नाल्यांचे पाणी नेर्से, खानापूर येथून कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत. नेर्से येथे विशाल ‘फेब्रिकेशन’ (लोखंडाची वेल्डिंग किंवा इतर माध्यमातून जोडणी करणे) केंद्र स्थापन करण्यात आले आहे आणि हे केंद्र कर्नाटकला कळसा-भंडुरा प्रकल्पांचे पाणी वळवण्यासाठी आवश्यक लोखंडी जलवाहिनी सिद्ध करणार आहे. नेर्से या भागाला भेट दिलेले विर्डी येथील रहिवासी चंद्रकांत अवखळे यांनी ही माहिती एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

चंद्रकांत अवखळे म्हणाले, ‘‘कर्नाटकने नेर्से येथे एक फेब्रिकेशन केंद्र चालू केले आहे आणि त्या ठिकाणी काही पाईप आणून ठेवण्यात आले आहेत. नेर्से येथे जंगलात जाणार्‍या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.’’ कर्नाटकने सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालानुसार भंडुरा नाल्यावर एक धरण बांधण्याचे नियोजन केले आहे. नेर्से येथील वन क्षेत्रामध्ये हे धरण बांधण्यात येत आहे. कर्नाटकने भंडुरा प्रकल्पासाठी १६.२ हेक्टर वन क्षेत्राची भूमी वापरण्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाकडे अनुमती मागितली आहे; मात्र कर्नाटकला अजूनपर्यंत प्रकल्पासाठी पर्यावरण आणि वन्यजीव दाखला मिळालेला नाही; मात्र कर्नाटकने एप्रिल २०२३ मध्ये नेर्से ते कोंगला रस्त्याच्या दुतर्फा खांब उभारून खुणा करण्याचे प्राथमिक काम पूर्ण केले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून कळसा-भंडुरा प्रकल्पांना त्वरित अनुमती द्यावी. उत्तर कर्नाटकमधील लोकांची पाण्याची आवश्यकता भागवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे कळवले आहे.


आता म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकमधील पर्यावरणप्रेमींचाही विरोध

म्हादईचे पाणी वळवल्यास उत्तर कर्नाटक विभाग ओसाड पडणार असल्याची भीती व्यक्त

पणजी – कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यासाठीच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांना केंद्राची अनुमती मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असले, तरी प्रत्यक्ष कर्नाटकमधील अनेक पर्यावरणप्रेमींनी म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवल्यास उत्तर कर्नाटक भाग ओसाड पडणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. कर्नाटक येथील ‘आम्ही पर्यावरणासाठी’ या गटाचे पर्यावरणतज्ञ कॅप्टन नितीन धोंड यांनीही अशीच भीती व्यक्त केली आहे.

कॅप्टन नितीन धोंड बेळगाव येथे प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘सह्याद्री पर्वतरांगांच्या संवर्धनाच्या दृष्टीने दोन दिवसांची बैठक नुकतीच धारवाड येथे पार पडली. या बैठकीत खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलाचे पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. खानापूर जंगल क्षेत्रात २ मुख्य नद्यांचा उगम होतो; मात्र या ठिकाणी विकास प्रकल्प राबवणे, जंगलतोड करणे, अवैज्ञानिक पद्धतीने शेती करणे आदींमुळे या नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नद्यांच्या पात्राला अडथळा निर्माण केल्याने या भागातील ‘पाणी सुरक्षा’ धोक्यात येणार आहे आणि याचा दुष्परिणाम संपूर्ण उत्तर कर्नाटक विभागाच्या पावसावर होणार आहे.’’

बैठकीत पर्यावरणप्रेमींनी विकासकामे करून पश्चिम घाटातील पर्यावरणाला धोका निर्माण केल्यास नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागणार असल्याची चेतावणी दिली आहे. या बैठकीत पर्यावरण, जैवविविधता, पाणी सुरक्षा, पर्यावरण अखंडता, पश्चिम घाटाला पर्यावरण संवेदशनील क्षेत्र घोषित करण्यासंबंधीचा मसुदा आदी विषयांवरही चर्चा झाली. या बैठकीला कर्नाटक राज्यातील विविध भागांतून वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ, लेखक, विचारवंत, पर्यावरणतज्ञ, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.