गरजूंसाठी सरकार मृत्यूपत्र ‘ऑनलाईन’ घरी येऊन करते !
शीर्षक वाचून गंमत वाटली असेल; परंतु हे सत्य आहे. ‘सरकार आपल्या दारी’, असा उपक्रम आपण नेहमीच ऐकत किंवा वाचत आलेलो आहोत; परंतु या लेखाच्या शीर्षकाप्रमाणे सरकार घरी येऊन सुद्धा काम करू लागले आहे आणि ही अतिशय चांगली अन् स्तुत्य गोष्ट आहे. गोव्यात ‘रजिस्टर्ड (नोंदणीकृत) ऑनलाईन मृत्यूपत्र (विल)’ करायचे असल्यास ते संबंधित ‘सबरजिस्ट्रार (उपनिबंधक) कार्यालयात’ जाऊन करावे लागते; किंबहुना सर्व प्रकारची कागदपत्रे जी ‘नोंदणीकृत’ करायची आहेत, ती तेथे जाऊनच करावी लागतात; कारण तेथे बोटांचे ठसे, तसेच ‘नोंदणीसाठी तुमचे ‘इन कॅमेरा’ छायाचित्र घेतले जाते, ती यंत्रणा ‘नोंदणीकृत संगणकीय प्रणाली’ला (‘रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर’ला) जोडलेली असते. आपण भरलेला मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी), तसेच ‘नोंदणी शुल्क’ या एकाच संकेतस्थळावर उपलब्ध असल्याने तेथे जाऊनच त्याची नोंदणी करावी लागते; परंतु ‘मृत्यूपत्र नोंदणी’च्या संदर्भात अतिशय सुखद असा पालट करण्यात आला आहे.
१. ऑनलाईन मृत्यूपत्र करण्यासाठी ‘उपनिबंधक’ संबंधितांच्या घरी जाऊन करत असलेली प्रक्रिया !
जी व्यक्ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे, जी चालू फिरू शकत नाही, जी मानसिकरित्या सक्षम अवस्थेमध्ये आहे; परंतु शारीरिकदृष्ट्या घरातून बाहेर जाऊ शकत नाही आणि तसे वैद्यकीय सक्षमतेचे प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) तिच्याकडे आहे, तर अशा व्यक्तींसाठी स्वतः उपनिबंधक त्यांच्या घरी जाऊन त्यांचे ‘मृत्यूपत्र ऑनलाईन नोंदणी’ करतात. उपनिबंधक कार्यालयामध्ये तशी कागदपत्रे, विनंती अर्ज जमा करावे लागतात. त्यानंतर एका योग्य वेळेस कोणतेही अधिक शुल्क न घेता उपनिबंधक हे त्यांच्या विशेष भ्रमणसंगणकासह पोचतात, ज्याला ‘कॅमेरा’, तसेच ‘थंब इम्प्रेशन’चे ‘ॲप’ (अंगठ्याचा ठसा घेण्याची प्रणाली) जोडलेले असते. ज्या ठिकाणी रुग्ण शय्येवर आहे, त्या ठिकाणी त्याचे छायाचित्र, ठसे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षर्या घेतल्या जातात. तेथेच मुद्रणयंत्राची (‘प्रिंटर’ची) सोय उपलब्ध झाल्यास लगेच त्याच्या प्रती काढून त्यावर स्वाक्षर्या सुद्धा घेतल्या जातात. त्यासमवेत असलेल्या २ साक्षीदारांच्याही स्वाक्षर्या आणि ठसे घेतले जातात. त्यामुळे अमूल्य असा वेळ वाचून पुष्कळ चांगले काम होते आणि ज्या व्यक्तीची ‘मृत्यूपत्र’ करण्याची इच्छा होती, ती पूर्ण होते. वरकरणी वाचायला हे पुष्कळ सोपे वाटते; परंतु ते सर्व कार्यवाहीत आणणे, हे सोपे काम नसते. उपनिबंधक कार्यालयातील नियमितची कामे यामुळे थोडीफार खोळंबली जातात.
सर्व साहित्याची जुळवाजुळव करणे सोपे नसते; परंतु एका पवित्र कर्तव्यासाठी ही मंडळी हा त्रास सहन करतात आणि एक आदर्श वस्तूपाठ घालून देतात, जे वाखाणण्यासारखे चांगले काम आहे. त्याचे कौतुक हे केलेच पाहिजे; कारण ‘सध्या सरकारी कार्यालयात काम थोडे रेंगाळते’, असा सार्वत्रिक अनुभव आहे. असे असतांना ज्या तत्परतेने आणि दायित्व घेऊन हे कार्य करत आहेत, हे गोवा राज्य शासनासाठीही अभिनंदनीय आहे.
२. ‘सरकार आपल्या दारी’ ही संकल्पना चांगली होण्यासाठी…
लेखाचा उद्देश चांगल्या कार्याचा गौरव करणे तर आहेच; परंतु राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयातून ही सुविधा गरजू रुग्णांना उपयोगी पडू शकते, याची जाणीव करून द्यायचा आहे. सध्या कदाचित मर्यादित स्वरूपात ही सुविधा उपलब्ध होत असेल; परंतु कालांतराने आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता केल्यास सुविधा नक्कीच उपलब्ध होईल. अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तीकडे वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नसल्याच्या प्रमाणपत्रासह इतर आवश्यक कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. जवळच जर ‘प्रिंटर’ची सोय करता आली, तर अतिशय उत्तम; कारण यामुळे रुग्णाचा वेळ वाचू शकतो. अशा वेळी नातेवाइकांचे साहाय्य सुद्धा आवश्यक आहेच. सरकारने उपनिबंधक कार्यालयांना असे विशेष भ्रमणसंगणक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले , तर अनेक गरजूंची ‘मृत्यूपत्र’ करण्याची इच्छा पूर्ण होईल आणि खर्या अर्थाने ‘सरकार आपल्या दारी’ ही संकल्पना रूढार्थाने खरी होईल.
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.