दुसर्याला दूषण देणे आणि ते शोधून बोलून दाखवणे हेच दुष्टपणाचे लक्षण !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : किं तद् पैशुन्यं उच्यते ?
अर्थ : दुष्टता कशाला म्हणावे ?
उत्तर : पैशुन्यं परदूषणम् ।
अर्थ : दुसर्याला दूषण देणे, दुसर्याचे दोषच हुडकणे, ते बोलून दाखवणे, हेच दुष्टपणाचे लक्षण आहे.
लुटालूट, मारपीट, जाळपोळ आणि हत्या ही सगळी दुष्टपणाचीच लक्षणे आहेत; पण ती पुष्कळ उग्र आहेत. त्यांची संख्या प्रशासनाच्या अविवेकामुळे, ढिलेपणामुळे आणि दौर्बल्यामुळे अधिकाधिक प्रमाणात आपल्या देशात वाढत आहे. असे जरी दिसत असले, तरी लोकसंख्येच्या प्रमाणात अशी क्रौर्याची कृत्ये करणार्या दुष्टांची संख्या सुदैवाने अद्यापही अल्प आहे. आपणही त्यास काही प्रमाणात उत्तरदायी आहोत. ‘जाऊ द्या की, मला काय त्याचे ?’, असे आपण म्हणत रहातो. दिसणार्या किंवा होणार्या अन्यायाच्या प्रतिकारासाठी आपण तात्काळ संघटितपणे उभे रहात नाही. प्रशासनाचा भ्रष्टाचार आणि निष्क्रीयता पुनःपुन्हा प्रत्ययास येत असतांनाही आपण प्रशासनासच दूषण देऊन मोकळे होतो. स्वतः मात्र काही करत नाही. ‘आपल्या अंतःकरणात पीडितांविषयी दया नाही, थोडीही सहानुभूती नाही’, असाच याचा अर्थ आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले) (साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)