मितभाषी आणि त्यागी असणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे देवगड येथील कै. शेखर इचलकरंजीकर !
‘२९.११.२०२३ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी आणि त्यानंतर माझे कै. शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) यांच्याशी ३ वेळा भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. मितभाषी
कै. शेखर यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना ते अत्यंत मोजक्या शब्दांत; पण मार्मिक आणि भावपूर्ण बोलत असत. त्यांच्याशी बोलल्यावर माझी भावजागृती होऊन मला आनंद मिळत असे.
२. स्वीकारण्याची वृत्ती
एकदा वीरेंद्रदादांनी मला एक सूत्र कै. शेखर यांना समजावून सांगण्यास सांगितले होते. माझी त्यांच्याशी एवढी जवळीक नव्हती, तरीही मी त्यांना भ्रमणभाष करून साधनेविषयी बोलत असतांना दादांनी सांगितलेले सूत्र सांगितले. तेव्हा त्यांनी ते सूत्र सहजतेने स्वीकारले.
३. अपेक्षा न करणे
वीरेंद्रदादा सेवेत अतिशय व्यस्त असल्याने त्यांना त्यांचे वडील कै. शेखर यांच्याकडे अपेक्षित असे लक्ष देता येत नसे, तरीही त्यांनी वीरेंद्रदादाकडून कसलीही अपेक्षा केली नाही कि कुठलेही गार्हाणे केले नाही. कै. शेखर यांना ‘मुलगा चांगली साधना आणि सेवा करत आहे’, याचाच आनंद होत असे.
४. त्याग
कै. शेखर इचलकरंजीकर यांनी त्यांचा मुलगा अधिवक्ता वीरेंद्र यांच्यावर चांगले संस्कार करून घडवले. त्यांनी हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे अनमोल रत्न गुरुचरणी अर्पण केले. यावरूनच त्यांचा त्याग आणि अन्य गुणवैशिष्ट्ये लक्षात येतात.
५. अहंशून्यता
कै. शेखर यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेला कै. शेखर यांची आध्यात्मिक प्रगती झाल्यानिमित्त मी त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सर्वकाही गुरुदेवांचे आहे. गुरुदेवांमुळेच सर्व काही होत आहे.’’ तेव्हा त्यांचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
‘कै. शेखर यांची यापुढेही आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (१०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.९.२०२४)