China : जगात चीनच्‍या एक तृतीयांश इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्‍या होणार्‍या वापरामुळे चीनविषयी भीती !

लेबनॉनमधील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमधील स्‍फोटांमुळे जग सतर्क !

नवी देहली – लेबनॉनमधील पेजरसह अन्‍य इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमध्‍ये झालेल्‍या स्‍फोटानंतर जगभरातील सरकारे सतर्क झाली आहेत. किंबहुना तंत्रज्ञानाचा वापर करून पेजरचा (वायरलेस उपकरणाचा) ज्‍याप्रकारे स्‍फोट करण्‍यात आला आहे, त्‍यामुळे तंत्रज्ञान आणि त्‍याच्‍या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. जगात चीनची एक तृतीयांश उपकरणे वापरली जात आहेत. अशा परिस्‍थितीत चिनी तंत्रज्ञानाच्‍या वापराविषयी पुन्‍हा चिंता व्‍यक्‍त केली जात आहे. चीनचे तंत्रज्ञान संशयाच्‍या भोवर्‍यात येण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. ‘चीनच्‍या चारचाकी गाड्या, घरगुती उपकरणे आणि लाइट बल्‍बमधील मायक्रोचीप हेरगिरीसाठी वापरली जाऊ शकतात. तसेच चिनी लॅपटॉप, व्‍हॉईस कंट्रोल स्‍मार्ट स्‍पीकर, स्‍मार्ट घड्याळे, स्‍मार्ट एनर्जी मीटर आणि शीतकपटे यांची इंटरनेटच्‍या साहाय्‍याने हेरगिरी करता येते’, असे याआधीही बोलले जात होते.

चिनी तंत्रज्ञानाचा वापर भारताविरुद्ध होण्‍याची भीती

जेव्‍हा इस्रायली गुप्‍तचर संस्‍थांकडून पेजरचा स्‍फोट केला जाऊ शकतो, तेव्‍हा चीनमधून आयात केलेले भ्रमणभाष, दूरचित्रवाणीसंच, घरगुती इलेक्‍ट्रीक उपकरणे हेरगिरीसाठी वापरली जाऊ शकतात. याद्वारे अन्‍य देशांमध्‍येही स्‍फोट घडवून आणले जाऊ शकतात. भारताच्‍या संदर्भात हा धोका अधिक वाढतो; कारण चीनने जर असे तंत्रज्ञान त्‍याचा मित्र पाकिस्‍तानला दिले, तर पाकिस्‍तान त्‍याचा वापर भारताविरुद्ध करू शकतो.

जगभरात निर्यात होणार्‍या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमध्‍ये चीनचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. याचा अर्थ जगात विकल्‍या जाणार्‍या प्रत्‍येक ३ इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तूंपैकी १ उपकरण चिनी बनावटीचे आहे. चीनचे आस्‍थापन ‘हुवेई’ (Huawei) हिच्‍या हेरगिरीवरून चीन आणि अमेरिका यांच्‍यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. भारताने ५जी नेटवर्कपासून चिनी उत्‍पादनांना दूर ठेवले आहे. याआधी अमेरिकेने चिनी उपकरणांच्‍या वापराविषयी चिंता व्‍यक्‍त केली होती. आता पेजर स्‍फोटामुळे चीनच्‍या तंत्रज्ञानावर संशय निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिका

चीनचे विस्‍तारवादी धोरण पहाता चीनने असे काही कृत्‍य केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही ! अशा चीनला धडा शिकवण्‍यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी चीनच्‍या विरोधात आघाडी उघडणे आवश्‍यक !