Jodhpur Crime : जोधपूर (राजस्थान) येथे १३ वर्षांच्या मुलाने केला ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
मुलाला भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पहाण्याचे होते व्यसन !
जोधपूर (राजस्थान) – येथे भ्रमणभाष संचावर अश्लील व्हिडिओ (पॉर्न) पाहून एका १३ वर्षांच्या मुलाने शेजारी रहाणार्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. भ्रमणभाषवरील खेळाचे (‘गेम’चे) आमिष दाखवून आरोपी मुलाने मुलीला घरी नेले, तेथे त्याने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुलाला अटक करून त्याला बालसुधारगृहात ठेवले आहे. जोधपूरमध्ये मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिनाभरात आतापर्यंत ६ हून अधिक घटना उघडकीस आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलाला भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पहाण्याचे व्यसन होते. तो बहुतांश वेळा अश्लील व्हिडिओ पहात असतो. आरोपी मुलाने अश्लील व्हिडीओ पाहून हे कुकृत्य केल्याचा संशय आहे.
संपादकीय भूमिकाआपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष आहे का ? ‘त्यांच्यावर योग्य संस्कार करत आहोत का ?’, याचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना साधनेचे संस्कार केल्यास अशा घटना घडणार नाहीत ! |