Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्‍ये वाटण्‍याचा झिम्‍बाब्‍वे सरकारचा निर्णय

झिम्‍बाब्‍वे देशातील दुष्‍काळामुळे ६ कोटी ८० लाख लोकांना फटका

हरारे – झिम्‍बाब्‍वे देशात उपासमारीचा सामना करण्‍यासाठी सरकारने हत्तींना मारण्‍याचे आदेश दिले आहेत. झिम्‍बाब्‍वेच्‍या ४ जिल्‍ह्यांमध्‍ये २०० हत्ती मारून त्‍यांच्‍या मांसाचे विविध समुदायांमध्‍ये वाटप करण्‍याचा निर्णय झिम्‍बाब्‍वे सरकारने घेतला आहे.

झिम्‍बाब्‍वेची जवळपास निम्‍मी लोकसंख्‍या अन्‍न संकटाचा सामना करत आहे. दुष्‍काळामुळे देशातील संपूर्ण पीक उद़्‍ध्‍वस्‍त झाले आहे. अशा परिस्‍थितीत झिम्‍बाब्‍वेतील ६ कोटी ८० लाखांहून अधिक लोक अन्‍नटंचाईने त्रस्‍त आहेत.

१. झिम्‍बाब्‍वेमध्‍ये सुमारे १ लाख हत्ती आहेत; मात्र येथील उद्यानात केवळ ५५ सहस्र हत्ती ठेवण्‍यासाठी जागा आहे. त्‍याचबरोबर दुष्‍काळामुळे देशातील नागरिक आणि हत्ती यांच्‍यात संतुलन राखण्‍यात अडचणी वाढण्‍याची शक्‍यता आहे.

२. गेल्‍या महिन्‍यात आफ्रिका खंडातील आणखी एक देश नामिबियामध्‍ये दुष्‍काळाचा सामना करण्‍यासाठी ८३ हत्तींची हत्‍या करून त्‍यांचे मांस लोकांमध्‍ये वाटण्‍यात आले होते.

३. वास्‍तविक जगातील हत्तींची सर्वांत मोठी संख्‍या बोत्‍स्‍वानामध्‍ये आहे. त्‍यानंतर झिम्‍बाब्‍वेचा क्रमांक लागतो. हत्तींच्‍या वाढत्‍या संख्‍येमुळे येथील जनजीवन धोक्‍यात आले आहे. ते त्‍यांच्‍या मार्गातील पिके तसेच लहान मुले यांनाही चिरडतात.