Tirupati Laddoo : तिरुपती बालाजीच्‍या प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये जनावरांच्‍या चरबीचा वापर केला ! – आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप

आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा माजी मुख्‍यमंत्री जगनमोहन रेड्डी  यांच्‍यावर गंभीर आरोप

डावीकडून मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्‍यमंत्री जगनमोहन रेड्डी

अमरावती (आंध्रप्रदेश) – तिरुपती बालाजीच्‍या प्रसादाच्‍या लाडूंमध्‍ये जनावरांच्‍या चरबीचा वापर होत होता, असा गंभीर आरोप आंध्रप्रदेशाचे मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्‍यमंत्री वाय.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्‍यावर केला आहे. तिरुमला तिरुपती देवस्‍थान जगभरात प्रसिद्ध असून येथे देण्‍यात येणारे प्रसादाचे लाडू अतिशय पवित्र मानले जातात.

पक्षाच्‍या बैठकीला संबोधित करतांना मुख्‍यमंत्री चंद्राबाबू नायडू म्‍हणाले की, गेल्‍या ५ वर्षांमध्‍ये जेव्‍हा वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तेव्‍हा त्‍यांनी पवित्र मानल्‍या जाणार्‍या तिरुमला तिरुपती देवस्‍थानाचे पावित्र्य घालवले. ‘अन्‍नदानम्’ अर्थात् जे अन्‍नदान मंदिराकडून केले जाते, त्‍याचा दर्जाही काँग्रेसच्‍या काळात खालावला होता. येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्‍ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्‍यांच्‍या चरबीचा वापर करण्‍यात आला. आमचे सरकार आल्‍यापासून आम्‍ही शुद्ध तुपातील लाडू बनवण्‍यास प्रारंभ केला आहे. तसेच मंदिरातील अन्‍नदानात दिल्‍या जाणार्‍या जेवणाचा दर्जाही आम्‍ही सुधारला आहे.

तिरुमला प्रसादाविषयी मुख्‍यमंत्री नायडू यांनी केलेल्‍या टिपण्‍या अत्‍यंत दुर्दैवी ! –  वाय.एस्.आर्. काँग्रेस

खासदार वाय.व्‍ही. सुब्‍बा रेड्डी

वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि राज्‍यसभा खासदार वाय.व्‍ही. सुब्‍बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्‍या आरोपावर प्रत्‍युत्तर देतांना म्‍हटले की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्‍या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्‍या श्रद्धेला गंभीर हानी पोचवली आहे. तिरुमला प्रसादाविषयी त्‍यांनी केलेल्‍या टिपण्‍या अत्‍यंत दुर्दैवी आहेत. अशा प्रकारचे शब्‍द कुणीही बोलणे अयोग्‍य आहे. चंद्राबाबू राजकीय लाभासाठी काहीही वाईट करायला मागेपुढे पहात नाहीत, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. भक्‍तांचा विश्‍वास दृढ करण्‍यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसाद प्रकरणात साक्षीदार म्‍हणून देवासमोर शपथ घेण्‍यास सिद्ध आहोत. चंद्राबाबूही कुटुंबासह शपथ घेण्‍यास सिद्ध आहेत का ? (वाय.एस्.आर्. काँग्रेसने यापेक्षा प्रसादामध्‍ये प्राण्‍यांच्‍या चरबीचा वापर केला कि नाही, याचे उत्तर दिले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

या प्रकरणी मुख्‍यमंत्री नायडू यांनी केवळ आरोप न करता पोलिसांत गुन्‍हा नोंदवून संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी आदेश दिले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !