Hezbollah Pager Blast : लेबनॉनमधील स्फोटांमागे ‘मोसाद’ नाही, तर इस्रायलचीच ‘युनिट ८२००’ गुप्तचर संस्था !
बेरूत (लेबनॉन) – लेबनॉनमध्ये १७ आणि १८ सप्टेंबर या दिवशी पेजर (वायरलेस उपकरण), वॉकी-टॉकी, रेडिओ, लॅपटॉप आणि सौर ऊर्जा पॅनल यांच्या झालेल्या स्फोटांमध्ये आतापर्यंत जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाच्या ३५ आतंकवाद्यांचा मृत्यू झाला, तर काही सहस्र लोक घायाळ झाले आहेत. यातही मोठ्या संख्येत आतंकवादी आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने हे स्फोट घडवून आणल्याचे दावे केले जात होते; मात्र इस्रायलची गुप्तचर सायबर शाखा ‘युनिट ८२००’ने हे स्फोट घडवून आणले आहेत, असे वृत्त प्रसारित झाले आहे. ही संस्था ‘मोसाद’पेक्षा वेगळी आहे. असे असले, तरी अद्याप इस्रायलने या आक्रमणांचे दायित्व स्वीकारले किंवा नाकारलेले नाही.
१. सूत्रांनी सांगितले की, ‘युनिट-८२००’ ही सायबर संस्था पेजर्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटके बसवणे, रिमोट-कंट्रोलद्वारे त्यांचे नियंत्रण मिळवणे आणि एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवून आणणे या तिन्ही गोष्टींवर या संस्थेने अनेक महिने काम केले होते.
२. माजी गुप्तचर अधिकारी आणि इस्रायलच्या ‘डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरम’चे संशोधक महासंचालक योसी कुपरवासर यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या आक्रमणात सैन्य गुप्तचर संस्थेचा किंवा ‘युनिट-८२००’चा कसलाही सहभाग नाही. युनिट ८२०० मधील सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले गुणी कर्मचारी आहेत. इस्रायलची संरक्षण क्षमता, सायबर सुरक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
‘युनिट-८२००’ची कार्यपद्धत
‘युनिट ८२००’ ही संस्था शत्रूराष्ट्रांची माहिती गोळा करणे, ती माहिती गुप्तचर यंत्रणा अन् संरक्षण यंत्रणांना पुरवणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे, सायबर सुरक्षा पुरवणे यांसारखी कामे करते. या युनिटची थेट ‘यूएस नॅशनल सिक्योरिटी एजन्सी’शी तुलना केली जाते. इस्रायली सरकार युनिट-८२०० च्या कारवाया आणि मोहिमा यांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर पडू देत नाही.
वॉकी-टॉकी बनवणार्या जपानी आस्थापनाचे स्पष्टीकरण
लेबनॉनमध्ये ज्या वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले, त्या वॉकी-टॉकी जपानच्या ‘आयकॉम’ आस्थापनाने बनवलेल्या होत्या. या स्फोटानंतर या आस्थापनाने निवेदन सादर करत म्हटले आहे की, ज्या वॉकी-टॉकींचा स्फोट झाला आहे, त्या मॉडलची निर्मिती दशकभरापूर्वीच बंद केली आहे. यासंदर्भात अन्वेषण चालू असून आम्ही लवकरच एक सविस्तर निवेदन प्रसारित करू.