मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
|
मिरज (जिल्हा सांगली), १८ सप्टेंबर (वार्ता.) – मिरज येथे १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. १७ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शेवटच्या श्री गणेशमूर्तीचे १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी १.१० मिनिटांनी विसर्जन झाले. ही मिरवणूक २८ घंटे चालली. या ऐतिहासिक मिरवणुकीत ९० टक्के ‘डॉल्बी’चा दणदणाट होता, तर उर्वरित १० टक्क्यांमध्ये बँजो वाद्यांचा समावेश होता. ‘डॉल्बी’मुळे ध्वनीचे प्रचंड प्रदूषण होऊन ‘डॉल्बी’चा लोकांनाही प्रचंड त्रास झाला. लेझीमसारख्या पारंपरिक पद्धतीच्या वाद्यांचा वापर केला गेला नाही. काही मंडळांनी लेझरचा वापर केला. (डॉल्बी आणि लेझरचा वापर होत असतांना पोलीस काय करत होते ? – संपादक)
रात्री १२ वाजता शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी ‘डॉल्बी’ची ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि बँजो बंद केला. यंदा बहुतांश मंडळांनी येथील गणेश तलावातच श्री गणेशमूर्तींचे क्रेनद्वारे विसर्जन केले. कृष्णा घाटावर विसर्जनाची व्यवस्था केली असतांनाही मंडळांनी तिकडे पाठ फिरवली. विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकही मिरज येथे आले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही मोठा समावेश होता. त्यामुळे सर्वत्र प्रचंड गर्दी होती.
मिरवणुकीत काही मंडळांचे कार्यकर्ते राक्षस, भुताचे मुखवटे घालून अश्लील हावभाव आणि नृत्य करत होते. शहरात ठिकठिकाणी हिंदु एकता आंदोलन, भाजप, शिवसेना, संघटना यांनी गणेशोत्सव मंडळांचे स्वागत केले. मिरवणुकीत ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी भाविकांसाठी पाण्याची सोय केली होती.
यंदाच्या मिरवणुकीत प्रथमच प्रत्येक १ घंट्यानंतर ५ मिनिटांसाठी मंडळांची ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद ठेवून त्यानंतर पुन्हा ध्वनीक्षेपक यंत्रणा चालू केली जात होती.