सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
सोलापूर, १८ सप्टेंबर (वार्ता.) – येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करावे’ यासंदर्भात प्रबोधन केले. या वेळी सर्वश्री यश मुगड्याल, ओंकार येरला, किशोर जगताप, प्रवीण नराल, धनंजय बोकडे, सतीश कुंचपोर, बसवराज पाटील, श्रद्धा सगर, कमल केंभावी आदी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. विसर्जनासाठी येणारे भाविक फलकांवरील लिखाण वाचून शास्त्र समजून घेत होते.
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने ‘श्री गणेशमूर्तीचे विसर्जन तलावात करण्यास बंदी आहे’ असे फलक जागोजागी लावले होते. महापालिकेकडून श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदातील पाण्यात बुडवून त्या खाणीत विसर्जन करण्यासाठी टेंपोतून नेण्यात येत होत्या, तसेच निर्माल्य संकलनासाठी कचर्याच्या गाड्यांचा वापर करण्यात आला. विसर्जनाच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले पहायला मिळाले. (श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात करणे अपेक्षित आहे. शहरातील संकलन केलेल्या श्री गणेशमूर्ती एकत्रितरित्या खाणीमध्ये विसर्जन करतांना श्री गणेशमूर्तींची विटंबना झालेल्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. असे असूनही वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जनासाठी विरोध का ? – संपादक)