बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
सावंतवाडी – बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत मोडकळीस आली आहे. ही वसाहत नव्याने बांधण्यात यावी, तसेच आवश्यक त्या सोयीसुविधा येथे देण्यात याव्यात, या मागणीसाठी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी २९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे. याविषयीचे निवेदन कल्याणकर यांनी बांदा पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. (कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांच्यावर धोकादायक वसाहतीत रहाण्याची वेळ येत असेल, तर ते एकाग्रतेने सेवा बजावू शकतात का ? याचा विचार प्रशासन आणि सरकार यांनी केला पाहिजे ! – संपादक)
गेली अनेक वर्षे बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत मोडकळीस आली आहे. ती दुरुस्त करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तत्कालीन गृहराज्यमंत्री तथा विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही पोलीस वसाहत दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ही वसाहत भग्नावस्थेत आहे. येथे रहाणार्या पोलिसांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही वसाहत तात्काळ नव्याने बांधण्यात यावी, यासाठी हे उपोषण करणार आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कल्याणकर यांनी या निवेदनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |