संताप सर्वांना हवा !
भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी वृत्तसंस्थेसाठी ‘महिला सुरक्षा – आता बस्स झाले’, या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्या लेखात त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांविषयी ‘इनफ इज इनफ’ असे उद्गार अतिशय संतापाने व्यक्त केले आहेत. ‘महिलांवर अत्याचार करण्याची फोफावलेली विकृती आणि महिला अल्प सामर्थ्यशाली, अल्प सक्षम अन् अल्प हुशार आहेत, अशी धारणा असलेली समाजाची मानसिकता. या गोष्टींचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशात संतापाची लाट उसळली पाहिजे. माझ्याही मनात अशा घटनांबद्दल चीड निर्माण झाली आहे. लोक संताप व्यक्त करतात, निदर्शने, आंदोलने करतात; पण कालांतराने अशा घटना विसरल्या जातात’, अशी परखड मते त्यांनी अत्यंत संतापाने व्यक्त केली आहेत. यातून त्यांच्यातील स्त्रीला देशातील स्त्रीत्वाची होणारी विटंबना असह्य झाली, हे अधोरेखित होते.
राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या संतापानंतर एका बाजूला दिलासा मिळाला असला, तरी देशातील शासनकर्त्यांची दुसरी बाजूही अतिशय चीड आणणारी आहे. नुकतेच ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मस’ (ए.डी.आर्.) आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ या संस्थांनी मिळून प्रसिद्ध केलेल्या निवडणूक अहवालात असे स्पष्ट केले की, १५१ आमदार, खासदार आणि मंत्रीमंडळातील मंत्री यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यावरून आजच्या समाजाची आणि राजकारणाची काय अवस्था झाली आहे, याचा अंदाज येतो. गुन्हेगारीवर वचक का रहात नाही ?, महिलांविषयक गुन्ह्यांचेही राजकारण का होते ?, याचाही उलगडा या आकडेवारीमुळे होतो. समाजाला शासनकर्त्यांनी दिशा देणे अपेक्षित आहे. त्यांचेच वागणे असे असेल, तर महिलांवरील अत्याचारांच्या विरोध कठोर नियम करणे, त्याचे पालन करण्यास प्रशासन आणि जनता यांना भाग पाडणे, हे शक्य होणार का ? तर याचे उत्तर ‘नाही’, असेच म्हणावे लागते अन् असेच समाजात चित्रही आहे.
शासनकर्तेच महिलांवर अत्याचार करणारे किंवा अत्याचार करणार्याला संरक्षण देणारे असतील, तर कायद्याची कडक कार्यवाही होणार तरी कशी ? राष्ट्रपतींनी महिला अत्याचारांवर व्यक्त केलेला संताप या दिशेनेही गेल्यास आणि त्यामध्ये कशा पद्धतीने पालट करू शकतो ?, अशी उपाययोजना त्वरित काढल्यास राष्ट्रपतींचा संताप महिलांसाठी सुखावह होईल. असा संताप शासनकर्ते, पोलीस यांनाही का येत नाही ?, हाही प्रश्न अनुत्तरित रहातो. सर्व पहाता राष्ट्रपतींनी व्यक्त केलेला संताप सर्वच महिलांना यायला हवा. ‘स्त्री ही शक्ती आहे’, त्यामुळे स्त्रीने व्यक्त केलेला संताप वासनांध पुरुषांच्या वासना नष्ट करू शकतो हे नक्की !
– वैद्या (सुश्री) माया पाटील, देवद, पनवेल.