पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
पुणे, १८ सप्टेंबर (वार्ता.) – सर्व श्री गणेशभक्तांचे आकर्षण असलेली वैभवशाली श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होऊन ती २८ घंट्यांनंतर म्हणजे दुसर्या दिवशी दुपारी ३ वाजता संपली. अनंतचतुदर्शीला सकाळी १० वाजता मानांच्या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला; मात्र नंतरच्या मंडळांच्या मिरवणुका रेंगाळल्या. शहरातील लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या प्रमुख रस्त्यांवरून जल्लोषांमध्ये श्री गणेशबाप्पाला निरोप दिला जातो. लक्ष्मी रस्त्यांवर मानांचे आणि प्रतिष्ठित मंडळांच्या मिरवणुका जातात. त्या पाठोपाठ इतर मंडळे मिरवणुकींमध्ये सहभागी होतात. मध्यरात्री १२ नंतर ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करून मिरवणूक जागीच थांबते. सकाळी ६ वाजता ध्वनीक्षेपक यंत्रणा चालू करून पुन्हा मिरवणुकीस प्रारंभ होतो. (विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)
याविषयी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकींमध्ये लेझर दिव्यांवर बंदी असतांनाही त्याचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही मंडळांनी आवाजाची मर्यादाही ओलांडल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा मंडळांवर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे; मात्र आता माझ्याकडे त्याची संख्या उपलब्ध नाही. (पोलिसांकडे संख्याच उपलब्ध नसेल, तर ते कारवाई कशी करणार ? जनतेला शिस्त कशी लावणार ? – संपादक)
पोलिसांची कार्यकर्त्यांना मारहाण
अलका चौकाजवळील कुमठेकर रस्त्यांवरून येणार्या एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अचानक एकाच ठिकाणी थांबत मोठ्या आवाजामध्ये ‘डीजे’ वाजवण्यास प्रारंभ केला. यामुळे मागील श्री गणेशोत्सव मंडळांची कोंडी झाली. विसर्जन मिरवणुकीत व्यत्यय निर्माण झाला. पोलिसांनी वारंवार पुढे जाण्याची विनंती करूनही कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. अखेर पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु पोलीस दलांतील वरिष्ठ अधिकार्यांनी चर्चा करून मंडळाला पुढे जाण्यास प्रवृत्त केले.
ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू करण्यास नकार दिल्याने कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन !
गणेशोत्सवांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनुसार रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा कार्यकर्त्यांनी बंद केली होती; परंतु १८ सप्टेंबर या दिवशी सकाळी वाजता टिळक रस्त्यांवरील श्री गणेश मंडळांना ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू करण्यास पोलिसांनी अटकाव केल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. चर्चेनंतर पुन्हा अनुमती दिल्यावर ध्वनीक्षेपक चालू झाले.
‘डिहायड्रेशन’चा श्री गणेशभक्तांना त्रास !श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. भरदुपारी दर्शन घेण्यासाठी आलेल्या श्री गणेशभक्तांना ‘डिहायड्रेशन’चा (शरीरातील पाणी न्यून होण्याचा) त्रास होऊन चक्कर आल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे १२२ नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य देण्यात आले. ५-६ ढोलवादक घायाळ झाले. |