३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले
|
पुणे – शहरात चिकनगुनियाचा उद्रेक झाला आहे. पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येक दिवशी शेकडो चिकनगुनिया, डेंग्यु आणि हिवताप यांचे रुग्ण आढळत आहेत. असे असतांना पुण्यामध्ये मागील ३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळल्याचे राज्याच्या साथरोग विभागाचे म्हणणे आहे. पुण्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साथरोगाचा उद्रेक असतांना आरोग्य विभाग सत्ताधार्यांना खुश करण्यासाठी साथीच्या रोगांची खरी माहिती लपवत आहेत, असा आरोप होत आहे. (याविषयी प्रशासनाने नेमकी वस्तूस्थिती जनतेसमोर ठेवणे आवश्यक आहे. !- संपादक)
पुणे महापालिकेच्या कमला नेहरू, राजीव गांधी रुग्णालयांसह शहरातील ३० हून अधिक रुग्णालयांत प्रतिदिन शेकडो रुग्ण साथीच्या आजारामुळे पडताळणीसाठी, तर अनेकजण उपचारासाठी येत आहेत. असंख्य रुग्णांनी उपचारही घेतले आहेत. अनेकजण साथरोगाच्या ‘साइड इफेक्ट’मुळे हैराण आहेत. अशा अवस्थेत राज्याचा आरोग्य विभाग पुण्यात चिकनगुनियाचे केवळ १५१ रुग्ण असल्याचा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकांना कीटक रोग नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीही मिळत नाही. पुरेसे मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे पुण्यात कीटकनाशक फवारणीचा अभाव आहे.
पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे २०२, तर खासगी रुग्णालयात २ सहस्र ५७७ अशी एकूण २ सहस्र ७७९ रुग्णांची नोंद आहे. सरकारी रुग्णालयात चिकनगुनियाच्या १७६ रुग्णांची नोंद आहे. खासगी रुग्णालयातील आकडेवारी अद्याप संकलित केली गेली नाही.