रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या घंटापूजनानंतर घंटा वाजवल्यावर ‘त्या नादाचा काय परिणाम होतो ?’, याविषयी केलेल्या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
‘२२.२.२०२४ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात घंटेची स्थापना आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर साधक-पुरोहितांनी ती घंटा वाजवली. त्या वेळी ‘घंटावादनाच्या नादाचा काय परिणाम होतो ?’, याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. जाणवलेली सूत्रे
अ. घंटानाद आरंभ झाल्यावर माझे मन लगेच एकाग्र झाले.
आ. माझ्या मनातील विचार न्यून झाले आणि माझे मन नादाशी एकरूप झाले.
इ. ‘नादातील स्पंदने सगुणातून निर्गुणापर्यंत गेली’, असे मला जाणवले.
२. आलेल्या अनुभूती
२ अ. श्री घंटिकादेवीचे दर्शन होणे : त्यानंतर मला सूक्ष्मातून श्री घंटिकादेवीचे दर्शन झाले. तिच्या भोवती पुष्कळ पिवळा प्रकाश होता. प्रकाशमय किरणांतून तिचे रूप साकार होऊ लागले. तिने पिवळे वस्त्र आणि लाल रंगाचा शेला परिधान केला होता. ‘देवीच्या हातांमध्ये आकाशतत्त्व स्वरूप नादब्रह्मच आहे’, असे मला जाणवले.
२ आ. श्री घंटिकादेवीच्या ठिकाणी श्री महिषासुरमर्दिनीचे दर्शन होणे : नंतर काही क्षणांनी मला सूक्ष्मातून श्री घंटिकादेवीच्या ठिकाणी श्री महिषासुरमर्दिनीचे दर्शन झाले. त्यानंतर मला देवीचे वाहन असलेल्या सिंहराजाचेही दर्शन झाले. त्या वेळी मला तेजतत्त्व आणि आकाशतत्त्व जाणवत होते.
२ इ. शिवलोकाचे दर्शन होणे : शिवलोकात मला शिवाचे गण दिसले. ‘कैलासावर घंटेचा दिव्य नाद घुमत आहे’, असे मला जाणवले.
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, ‘आपल्याच अनंत कृपेमुळे या प्रयोगात सहभागी होता येऊन मला दिव्य घंटेच्या नादातील चैतन्य अनुभवता आले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)
प्रश्न : श्री घंटिकादेवी असते का ? या पूर्वी अशा देवतेविषयी मी ऐकले अथवा वाचले नाही. मला दिसलेले दृश्य सत्य आहे का ?
उत्तर :‘तशी देवी प्रत्यक्षात नाही; परंतु ‘या चराचरात देवत्व आहे’, असे आपल्याला आपल्या हिंदु संस्कृतीने शिकवले आहे. जसे भक्त प्रल्हादने ‘या खांबामध्येही भगवंत आहे’, असे आपले वडील दैत्यराज हिरण्यकश्यपू यांना सांगितले आणि खरोखरच खांबातून नरसिंह भगवान प्रगटले. प्रल्हाद हा देवाचा भक्त होता; म्हणून तसे घडले. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये एखाद्या वस्तूप्रती भाव असेल, तर आपल्याला तिच्यातील देवत्वाची जाणीव होऊ शकते. तुम्हालाही तशीच अनुभूती घंटापूजनाच्या वेळी घंटेप्रती आली.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (२४.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |