‘सनातनचे संत, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची रूपे आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
देवद येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली झरकर यांचा आध्यात्मिक त्रास आणि मनाची नकारात्मकता वाढल्यावर आश्रमातील सनातनचे सद्गुरु आणि संत यांनी त्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. या मार्गदर्शनाचा सौ. झरकर यांना झालेला लाभ येथे पाहूया.
१. आध्यात्मिक त्रासामुळे साधिकेचे मन भरकटत असल्याची जाणीव पू. रमेश गडकरी यांनी तिला करून देणे
अ. ‘एके दिवशी मी भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करत असतांना माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्या वेळी पू. रमेश गडकरीकाका (सनातनचे १९ वे संत, वय ६६ वर्षे) जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात होते. त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. त्यांनी माझ्या बाजूला बसलेल्या साधकाला खुणेने सांगितले, ‘अंजलीला बोलवा.’ त्या वेळी मी पू. गडकरीकाकांकडे पाहिल्यावर त्यांनी मला ‘कुठे आहात ?’, असे खुणेने विचारले. त्या वेळी ‘माझे मन भरकटत होते’, याची मला जाणीव झाली आणि मी नामजप करत महाप्रसाद ग्रहण केला.
आ. एके दिवशी मला पुष्कळ त्रास होत होता. माझ्या मनातील विचार वाढले होते. ‘नामजपादी उपाय करू नयेत’, असे मला वाटत होते. ‘मी विनाकारण इकडे-तिकडे फिरत होते’, हे पू. गडकरीकाकांनी पाहिले. त्यांनी मला बोलवले आणि विचारले, ‘‘काय होत आहे ? त्रास होत आहे का ?’’ त्या वेळी मला पुष्कळ रडू आले. मी खुणेनेच ‘हो’ म्हणाले. त्यांनी मला त्यांच्या बाजूच्या आसंदीवर बसवले आणि स्वतःभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढण्यास सांगितले, तसेच माझ्याकडून नामजपादी उपाय करून घेतले. त्यानंतर मला थोडे हलके वाटले.
२. पू. दाभोलकरकाका यांनी साधिकेने फलकावर लिहिलेल्या चुका वाचून तिची स्थिती जाणणे आणि तिला व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करणे
माझ्याकडून स्वभावदोष-निर्मूलनाच्या संदर्भातील लिखाण आणि सत्रे होत नव्हती. मी माझ्या मनात येणार्या नकारात्मक विचारांच्या संदर्भातील चुका फलकावर लिहिते. त्या वाचून पू. दाभोलकरकाका (पू. गुरुनाथ दाभोलकरकाका (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) माझी मनाची स्थिती जाणून घेतात आणि मला व्यष्टी साधना करण्यास प्रोत्साहित करतात. ते मला सांगतात, ‘‘सद्गुरु राजेंद्रदादा तुमचा आढावा घेतात. त्यांना तुमच्या मनाची स्थिती सांगत जा. सद्गुरु राजेंद्रदादा जे प्रयत्न सांगतील, ते करत जा. तुम्ही यातून लवकर बाहेर पडाल. वाईट शक्ती मनात नकारात्मक विचार घालतात. त्यांच्याशी लढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या समवेत परम पूज्य आहेत ना !’’
३. पू. शिवाजी वटकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीचे प्रसंग सांगून साधिकेला त्रासातून बाहेर काढणे
मला होणार्या त्रासामुळे, तसेच माझ्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे मला संतांशी बोलावेसे वाटत नाही; पण पू. शिवाजी वटकरकाका (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे) यांना माझी स्थिती लगेच कळते. माझा त्रास वाढलेला असतांना पू. वटकरकाका भोजनकक्षात महाप्रसादाला आल्यावर मला म्हणतात, ‘‘तुम्ही कुठे बसणार ? मी तिथे येतो.’’ पू. काका मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीचे प्रसंग सांगून मला त्रासातून बाहेर काढतात.
४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे प्रेम मिळणे
एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला. त्या वेळी परम पूज्य म्हणाले, ‘‘देवदला राजन (सद्गुरु राजेंद्र शिंदे, वय ६१ वर्षे) आहे. त्यामुळे मला आता तुमची काळजी नाही. मी निश्चिंत झालो.’’ त्या वेळी मी बुद्धीने विचार केला, ‘आता मला परम पूज्यांनी सद्गुरु राजेंद्रदादांकडे सोपवले, म्हणजे मला आता रामनाथी आश्रमात यायला मिळणार नाही.’ कालांतराने ‘सद्गुरु दादा, म्हणजे परम पूज्यांचेच एक रूप आहे’, हे मला अनुभवायला मिळाले. ‘परम पूज्य साधकांवर कसे प्रेम करतात ?’, हे मी साधकांकडून ऐकले होते आणि मीही ते अनुभवले होते. तसेच प्रेम मला सद्गुरु दादांकडून मिळू लागले.
५. ज्याप्रमाणे रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आहेत, त्याप्रमाणे देवद आश्रमात पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३४ वर्षे) आहेत.
६. सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनीताई यांच्याकडून प्रेम अन् आधार मिळणे
सद्गुरु राजेंद्रदादा आणि पू. अश्विनीताई यांच्याकडून मला प्रेम अन् आधार मिळत आहे. त्यामुळे मला ‘रामनाथीला जाऊया. परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटूया’, असे कधीच वाटत नाही, तसेच ‘रामनाथी अन् देवद येथील आश्रम वेगवेगळे आहेत’, असेही मला जाणवत नाही. दोन्ही आश्रम एकच वाटतात.
सर्व संत आणि सद्गुरु यांच्या प्रेमामुळेच देवद आश्रमाच्या वातावरणात पालट होत आहेत. ‘सर्व संत म्हणजे परात्पर गुरुदेवांचीच रूपे आहेत’, हे अनुभवायला दिल्याबद्दल परात्पर गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.२.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |