नातेवाइकांचा विरोध पत्करून मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) !
८.९.२०२४ या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शेखर इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. १९.९.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्रीमती मीनाक्षी इचलकरंजीकर (कै. शेखर इचलकरंजीकर यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७० वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. आदर्श पती : ‘मला माझ्या यजमानांचा (कै. शेखर यांचा) ५३ वर्षे सहवास मिळाला. आमच्यामध्ये कधीही भांडण झाले नाही. आम्ही जरी पती-पत्नी होतो, तरी आमचे बहीण-भावासारखे प्रेमळ नाते होते. आम्हाला समाजातील लोक ‘आदर्श पती-पत्नी’ म्हणायचे.
१ आ. आमचे लग्न झाल्यावर यजमानांनी शून्यातून संसार उभा केला. आमच्यावर अनेक कठीण प्रसंग आले, तरी आम्ही दोघे एक मनाने सर्व प्रसंगांना सामोरे गेलो.
१ इ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना : आम्ही उभयतांनी २७ वर्षांपूर्वी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. तेव्हापासून ‘आपल्याला साधनेविना काहीच नको’, असे यजमान म्हणायचे. त्यांनी झोकून देऊन साधना केली.
१ ई. नातेवाइकांचा विरोध पत्करून मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणे : आमचा मुलगा (अधिवक्ता वीरेंद्र) पूर्णवेळ साधना करू लागल्यावर आमच्या नातेवाइकांचा आम्हाला पुष्कळ विरोध झाला. तेव्हा यजमानांनी न डगमगता प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून वीरेंद्रला पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
१ उ. निरपेक्षता : यजमानांना मायेतील गोष्टींची आवड नव्हती किंवा त्यांच्या कुणाकडून कसल्याही अपेक्षा नव्हत्या. एक वर्षापूर्वी यजमानांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा त्यांनी त्याविषयी मुलांना कळवलेही नाही. ‘साधना सोडून मुलांनी आपली सेवा करावी’, असे त्यांना कधीच वाटले नाही.
१ ऊ. ‘आपल्या मुला-मुलींनी आणि समाजाने साधना करावी’, असे त्यांना वाटत असे.
१ ए. पत्नीला साधनेत साहाय्य करणे : मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास व्हायचा. तेव्हा यजमान मला म्हणायचे, ‘‘तुझ्या त्रासामुळे माझी साधनेची तळमळ वाढते.’’ त्यांनी माझ्या साधनेला कधीच विरोध केला नाही. त्यांनी मला साधनेत नेहमीच साहाय्य केले. साधनेसाठी यजमान हे माझे ‘देव’च होते.
१ ऐ. पत्नीची आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिल्याचे कळल्यावर तिला सकारात्मक दृष्टीकोन देऊन प्रोत्साहन देणे आणि साधनेचे प्रयत्न वाढवणे : वर्ष २०२४ मधील गुरुपौर्णिमेला यजमानांची आध्यात्मिक पातळी १ टक्का वाढली आणि माझी आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझी बरीचशी साधना तुझ्या आध्यात्मिक त्रासांशी लढण्यात व्यय झाली. तू काळजी करू नकोस. आता आपण पुन्हा साधनेचे प्रयत्न वाढवूया.’’ गुरुपौर्णिमेनंतर आम्ही दोघांनी पहाटे उठून नामजप आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले होते. ‘गुरुदेवांनी आम्हाला लवकरात लवकर संतपदाला पोचवावे’, अशी यजमानांची तळमळ होती.
१ ओ. ३०.८.२०२४ या दिवशी यजमानांना रुग्णालयात भरती केले. त्या वेळी मला त्यांच्या डोक्याभोवती ‘ॐ’चे प्रकाशमान कवच फिरतांना दिसत होते.
१ अं. यजमानांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
१. यजमानांच्या मृत्यूनंतर आरंभी माझ्या मनाचा संघर्ष झाला. नातेवाईक आणि ओळखीचे लोक भेटायला आल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. त्यानंतर मला माझ्या ब्रह्मरंध्रावर चैतन्याची वलये जाणवू लागली. तेव्हापासून आतापर्यंत त्या चैतन्यलहरी मला सतत जाणवत आहेत. त्यामुळे मला सत्मध्ये रहाता येत आहे.
२. माझा आतून सतत ‘सच्चिदानंद परब्रह्म’, असा नामजप चालू आहे.
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला चैतन्यशक्ती पुरवत आहेत’, असे मला जाणवत आहे.
मी माझ्या यजमानांचे गुणवर्णन शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला देवस्वरूप, आदर्श आणि आध्यात्मिक पती मिळाल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् माझे यजमान यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (कै. शेखर इचलकरंजीकर यांचा मुलगा), राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.
२ अ. ‘वडिलांची शारीरिक स्थिती गंभीर आहे’, हे कळल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘त्या स्थितीत कसे वागायला हवे ?’, हे सूक्ष्मातून शिकवणे : ‘३०.८.२०२४ या दिवशी ‘अप्पांची (माझे वडील शेखर इचलकरंजीकर यांची) शारीरिक स्थिती गंभीर आहे आणि तातडीने निघून गावी यावे’, असा निरोप मला मिळाला. मी गावी निघण्याच्या सिद्धतेत असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील एक प्रसंग २ वेळा त्यांच्या आवाजात स्पष्टपणे ऐकू आला. त्याचा आशय पुढीलप्रमाणे होता, ‘वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सेवेसाठी इंदूर येथे जाणार होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर ठरलेल्या दिवशी इंदूर येथे जाणार होते; परंतु प.पू. भक्तराज महाराज त्यांना म्हणाले, ‘‘लगेच येणे सामाजिक दृष्टीने बरे नाही. तुम्ही ३ दिवसांनंतर या.’
यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला माझ्या वडिलांच्या अंतिम आजारपणात आणि निधन झाल्यावर साधनेच्या दृष्टीने कसे वागायला हवे ?’, हे सूक्ष्मातून शिकवले.
२ आ. वडील रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे
१. रुग्णाईत वडिलांची सेवा करत असतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. माझी अधूनमधून भावजागृती होत होती. ‘मी माझ्या गुरूंची सेवा करत आहे’, असे मला जाणवत होते.
२.३०.८.२०२४ ते ८.९.२०२४ या ८ दिवसांत माझे पुष्कळ जागरण झाले, तसेच जेवणाच्या वेळेत पालट झाले, तरीही मला थकवा जाणवला नाही. एरव्ही या स्थितीत मला थकवा जाणवतो आणि आध्यात्मिक त्रासही होतो.
३. या ८ दिवसांच्या कालावधीत वडील कधी शुद्धीत, तर कधी अर्धवट गुंगीत असायचे; परंतु त्यांनी कुणाकडून कसलीच अपेक्षा केली नाही किंवा कोणतीच नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही.
४. ८.९.२०२४ या दिवशी दुपारपर्यंत वडिलांची स्थिती चांगली होती. दुपारी १ वाजता वडिलांच्या इच्छेनुसार मी त्यांना चाकांच्या आसंदीवरून (‘व्हील चेअर’वरून) रुग्णालयाच्या बाहेर नेऊन फिरवून आणले.
५. आम्ही परत आल्यावर पलंगावर झोपण्याआधी ते मला म्हणाले, ‘‘चल, सर्व रुग्णांना भेटून येऊया.’’ त्यानंतर मी त्यांना चाकांच्या आसंदीवरून अन्य रुग्णांकडे घेऊन गेलो. त्यांनी प्रत्येक रुग्णाला नमस्कार केला. तेव्हा मला त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद जाणवला. नंतर ते झोपले.
२ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ८.९.२०२४ या दिवशी रात्री ९.३० वाजता वडिलांचे पार्थिव घरी आणल्यावर त्यांना बसलेल्या स्थितीत ठेवले होते. तेव्हा ‘ते ध्यानाला बसले आहेत’, असे मला जाणवत होते.
२. आमच्या नातेवाइकांनाही ‘वडिलांचा श्वास चालू असून त्यांची छाती वर-खाली होत आहे’, असे जाणवले.
३. घरी पार्थिवाचे दर्शन घेतांना ‘आपण देवळात आलो आहोत’, असे एका नातेवाइकाला वाटले.
४. वडिलांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी आम्ही कुणकेश्वर (देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील समुद्रावर गेलो होतो. जेव्हा मी अस्थी घेऊन किनार्यापासून दूर समुद्रात गेलो, तेव्हा एक मोठी लाट आली. तेव्हा ‘ती लाट मला ‘अस्थीविसर्जनासाठी इथेच थांब’, असे म्हणत आहे’, असे मला जाणवले. मी तिथेच थांबून अस्थीविसर्जन केले. मी परत समुद्रकिनार्यावर येईपर्यंत तशी मोठी लाट आली नाही.
५. वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरातील खोल्यांमध्ये, प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर, आईच्या अंगावर आणि पलंगावर अन् माझ्या अंगावर दैवी कण दिसत होते.
३. सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (कै. शेखर इचलकरंजीकर यांची सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे
१. रुग्णालयातील ८ दिवसांमध्ये माझे सासरे (अप्पा) कधीही चिडून किंवा रागावून बोलले नाहीत. ते सतत हसतमुख होते.
२. अप्पांच्या दोन्ही हातांना ‘सलाईन’ लावले होते, तरीही ते अधूनमधून हात जोडून प्रार्थना करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही त्यांना सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे.’’ तेव्हा त्यांनी हात जोडले आणि भावपूर्ण नमस्कार केला.
३. ८.९.२०२४ या दिवशी अप्पा मला म्हणाले, ‘‘वातावरण खराब आहे. हिंदूंची स्थिती फार वाईट आहे. आपण लवकर घरी जाऊया.’’ तेव्हा ‘त्यांना सूक्ष्मातून सर्व दिसत आहे’, असे मला वाटले.
३ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. अप्पांच्या चेहर्यावरील तेज वाढत आहे’, असे मला जाणवले.
२. घरातील सर्वांना चैतन्य जाणवत होते.
३. अप्पांचे छायाचित्र पाहिल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘त्यांच्याकडे पाहून ते शांतपणे झोपले असून त्यांचे ध्यान लागले आहे’, असे वाटत आहे. तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवते. ‘त्यांना चांगली गती मिळाली’, असे मला वाटते.’’
४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितले, ‘‘त्यांची साधना चालू आहे आणि ते साधनेत पुढे चालले आहेत.’’ सद्गुरु सत्यवान कदम यांनीही तसेच सांगितले.’
४. सौ. भाग्यश्री प्रमोद देशमाने (कै. शेखर इंचलकरंजीकर यांची मोठी मुलगी), कराड, जिल्हा सातारा.
अ. ‘९.९.२०२४ या दिवशी माझ्या वडिलांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करण्यात आले. त्या दिवशी दुपारी ज्या खोलीत दिवा लावला होता, त्या खोलीत मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप अर्धा ते १ मिनिट ऐकू आला. मी अन्य नातेवाइकांना ‘कुणी भ्रमणभाषवर नामजप लावला आहे का ?’, असे विचारले; परंतु कुणीही जप लावलेला नव्हता.
आ. आमच्या ओळखीच्या एक परिचारिका गीता घाडी यांनी दिवा लावलेल्या खोलीत जाऊन नमस्कार केला. तेव्हा त्यांना प्राजक्तासह अन्य फुलांच्या सुगंधाची अनुभूती आली.
इ. वडिलांच्या निधनाच्या दुसर्या दिवसापासून प्रतिदिन केर काढतांना केरात सोनेरी रंगाचे दैवी कण सापडत आहेत.’
५. सौ. दुर्गेशा लोखंडे (कै. शेखर इंचलकरंजीकर यांची मधली मुलगी), कोल्हापूर
अ. ‘अप्पांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मला माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ वेळ चांगल्या संवेदना जाणवत होत्या.’
६. श्री. प्रमोद देशमाने (कै. शेखर इंचलकरंजीकर यांचे मोठे जावई), कराड, जिल्हा सातारा.
अ. श्री. वीरेंद्र (कै. शेखर इंचलकरंजीकर यांचा मुलगा) अस्थीविसर्जनासाठी समुद्रात पुढे गेले. तेव्हा आम्ही किनार्यावर थांबलो होतो. श्री. वीरेंद्र अस्थीविसर्जन करत असतांना ‘समुद्र जणू अस्थी आणि रक्षा स्वीकारण्यासाठी थांबला होता’, असे मला जाणवले.
आ. विसर्जित रक्षेचा काही भाग लाटेसह किनार्याकडे आला आणि परत गेला. तेव्हा ‘सासरे आम्हाला शेवटचे भेटायला आले आणि निघून गेले’, असे मला वाटले.’
७. सौ. अरुणा झुरे (कै. शेखर इंचलकरंजीकर यांची बहीण, वय ६१ वर्षे), कळे, जिल्हा कोल्हापूर
अ. ‘१०.९.२०२४ या दिवशी पहाटे ५ ते ५.४५ या वेळेत मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत होते. तेव्हा ‘घरातल्या ध्यानमंदिरातील मारुतिरायाच्या चित्रातून चैतन्याचा स्रोत प्रक्षेपित होत असून तो संपूर्ण घरभर पसरत आहे’, असे मला जाणवले.’
८. श्रीमती श्यामला देशमुख (सुनेची आई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), नाशिक
अ. ‘आम्ही रुग्णालयात जाऊन अप्पांना भेटून आलो आणि नाशिकला जाण्यास निघालो. ‘अनुमाने १ ते दीड घंट्यानंतर अप्पांना पुन्हा त्रास होऊ लागला’, असे माझी मुलगी सौ. सावित्री हिने मला भ्रमणभाषवरून कळवले. त्या वेळी आम्हाला एक मुंगूस दिसले. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर मला अप्पांच्या भोवती श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरतांना दिसले. हे सर्व मला शुभ वाटले.’
९. सौ. निशिगंधा नाफडे आणि श्री. अनिमिष नाफडे (सुनेची बहीण अन् तिचे यजमान), फोंडा, गोवा.
अ. ‘अप्पांना हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. (व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.) त्या वेळी गुंगीचे औषध दिल्याने त्यांना शुद्ध नसली, तरी ‘आतून त्यांचा नामजप चालू आहे’, असे आम्हाला वाटत होते.
आ. अप्पांची साधना चांगली असल्याने त्यांच्यात इतर रुग्णांच्या तुलनेत स्थिरता जाणवली.
इ.८.९.२०२४ या दिवशी अप्पांना सायंकाळी पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावरही ते पुष्कळ स्थिर वाटत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १२.९.२०२४)