UP Flood : उत्तरप्रदेशात पावसामुळे २१ जिल्ह्यांतील २३५ गावे पाण्याखाली : ४ लाख लोकांना फटका !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेेशात पावसामुळे २१ जिल्ह्यांतील २३५ गावे यमुनेच्या पाण्यात बुडाली आहेत. या जिल्ह्यांतील ४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वाराणसीतील गंगा धोक्याच्या चिन्हापासून अवघ्या ४४ सेमी दूर आहे. ८५ घाट आणि २ सहस्र छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
बंगालमध्ये ९ जिल्ह्यांत पूर !
बंगालमधील बीरभूम, बांकुरा, हावडा, हुगळी, उत्तर-दक्षिण २४ परगणा, पूर्व-पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम वर्धमान जिल्ह्यांमध्येही पूर आला आहे. या पुरामुळे २४ घंट्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेशातील २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस !
मध्यप्रदेशातील २४ हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाळ्यात आतापर्यंत ४१ इंच पाऊस झाला आहे, जो सामान्य पावसापेक्षा १० टक्के अधिक आहे.
राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी !
राजस्थानमधील २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे. यासह मध्यप्रदेश आणि हरियाणा यांसह १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले.