Palestine Flags : मध्‍यप्रदेशात ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी मुसलमानांकडून फडकावण्‍यात आले पॅलेस्‍टाईनचे झेंडे !

भोपाळ (मध्‍यप्रदेश) – ईद मिलाद-उन-नबीच्‍या निमित्ताने १६ सप्‍टेंबरला मध्‍यप्रदेशसह देशभरात अनेक ठिकाणी मुसलमानांनी मिरवणुका काढल्‍या. या मिरवणुकांमध्‍ये अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्‍या. काही ठिकाणी प्रक्षोभक घोषणाबाजी करण्‍यात आली आणि इस्‍लामी देशांचे झेंडे फडकावण्‍यात आले. रतलाम, मंदसौर, श्‍योपूर, मंडला, बालाघाट इत्‍यादी जिल्‍ह्यांमध्‍ये धर्मांध मुसलमानांनी उपद्रव केला. या सर्व प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून अन्‍वेषण चालू केले आहे. काही लोकांना अटकही करण्‍यात आली आहे.

रतलाममध्‍ये डीजेवर (मोठी संगीत यंत्रणा) ऐकवण्‍यात आली अकबरुद्दीन ओवैसी यांची चिथावणीखोर वक्‍तव्‍ये

रतलाम जिल्‍ह्यात मिरवणुकीमध्‍ये पॅलेस्‍टाईनचे झेंडे फडकावण्‍यात आले. या घटनेचा व्‍हिडिओही सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे. या मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह वक्‍तव्‍ये ऐकवण्‍यात आली. यांतील बहुतांश विधाने एम्.आय.एम्. पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची आहेत. या विधानांमध्‍ये ओवैसी मुसलमान लोकसंख्‍येचा हवाला देत त्‍यांना रस्‍त्‍यावर उतरण्‍यास उद्युक्‍त करत असल्‍याचे ऐकायला मिळते. रतलामचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी या घटनांची नोंद घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्‍यक ती कायदेशीर कारवाई करण्‍याची सूचना त्‍यांनी दिली आहे.

मंडलामध्‍ये हिंदु संघटनांकडून कारवाईची मागणी

मध्‍यप्रदेशातील मंडला-बालाघाट येथे ईदच्‍या मिरवणुकीत पॅलेस्‍टाईनचा ध्‍वजही फडकावण्‍यात आला. या घटनेची माहिती मिळताच हिंदु संघटनेच्‍या सदस्‍यांनी विरोध केला. त्‍यांनी पोलीस ठाण्‍याला घेराव घातला. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्‍यात आली. झेंडा फडकावणार्‍या फरदीन याला पोलिसांनी तात्‍काळ कह्यात घेतले. तसेच बालाघाटच्‍या अनेक भागांत मिरवणुकीत पॅलेस्‍टिनी झेंडे फडकावण्‍यात आले.

श्‍योपूरमध्‍ये शिरच्‍छेदाच्‍या घोषणा

मध्‍यप्रदेशातील श्‍योपूरमध्‍ये ईदच्‍या मिरवणुकीत मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्‍या (शिर धडापासून वेगळे करण्‍याच्‍या) घोषणा देण्‍यात आल्‍या. या संदर्भात सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झालेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये मोठा पांढरा झेंडा घेऊन एका व्‍यक्‍तीच्‍या मागे जात काही लोक ‘गुस्‍ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुडा, सर तन से जुडा’ अशा घोषणा देत असतांना दिसत आहेत. या पांढर्‍या ध्‍वजावर काळ्‍या रंगात छापलेली मोठी तलवार आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्‍याची मागणी करत हिंदु संघटनेच्‍या सदस्‍यांनी पोलीस ठाण्‍यात निदर्शने केली. मिरवणुकीत सहभागी झालेल्‍या काही मुसलमानांनी हिंदूंच्‍या घरांनाही लक्ष्य केल्‍याचा आरोप आहे. वाटेत असलेल्‍या हिंदूंच्‍या घरांसमोर घोषणाबाजी करण्‍यात आली आणि फटाके फोडण्‍यात आले. या कृत्‍यामुळे एक महिलाही भाजली. जमावाचा उपद्रव रोखण्‍यात अपयशी ठरल्‍याने आतापर्यंत एकूण ५ पोलिसांना निलंबित करण्‍यात आले आहे.

संपादकीय भूमिका

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच राष्‍ट्रप्रेमींना वाटते ! झेंडे फडकावणार्‍यांना पकडून पुन्‍हा असे करण्‍याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा करणे आवश्‍यक आहे !