Vladimir Putin : घटत्या लोकसंख्येमुळे नागरिकांनी कामाच्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवावेत !

रशियातील पुतिन सरकारचे आवाहन !

मॉस्को (रशिया) – रशियाची लोकसंख्या अल्प होत असल्याने चिंतेत असलेल्या पुतिन सरकारने नागरिकांना कार्यालयात काम करतांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे. रशियाच्या लोकांचे भविष्य आता त्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या १० देशांमध्ये रशियाचा समावेश होतो; मात्र गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या सातत्याने घटत आहे. रशियामध्ये या वर्षी जूनमध्ये १ लाखांपेक्षा अल्प मुलांचा जन्म झाला. वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत अनुमाने ६ लाख मुलांचा जन्म झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १६ सहस्रांनी अल्प आहे.

१. पुतिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रशियाच्या महिलांना किमान ८ मुलांना जन्म देण्यास सांगितले होते. पुतिन म्हणाले होते की, अनेक समुदायांमध्ये अजूनही अधिक मुले जन्माला घालून कुटुंब वाढवण्याचा आणि परंपरा जपण्याचा प्रघात आहे. आपण हे लक्षात ठेवायला हवे की, आपल्या आजी आणि पणजी यांच्या काळात ७-८ मुले होत होती.

२. यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये पुतिन यांनी १० मुलांना जन्म देणार्‍या महिलांना ‘मदर हिरोईन’ नावाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. हा पुरस्कार दुसर्‍या महायुद्धात महिलांनाही देण्यात आला होता. त्या काळातही रशियाची लोकसंख्या झपाट्याने अल्प होत होती. वर्ष १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे विभाजन झाल्यानंतर रशियाने हा पुरस्कार देणे बंद केले.