Hezbollah Threatens Israel : पेजर आक्रमणाचा सूड उगवण्याची हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेची धमकी

  • लेबनॉनमध्ये पेजरच्या स्फोटांत आतापर्यंत ११ जण ठार, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ

  • इस्रायलने स्फोट घडवल्याचा केला जात आहे दावा !

बेरूत (लेबनॉन) – इस्रायलचा शेजारी देश लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबरला हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांकडील पेजर्समध्ये झालेल्या साखळी स्फोटांत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले. यांतील ४०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घायाळांमध्ये इराणच्या लेबनॉनमधील राजदूताचाही समावेश आहे. बहुतेक पेजर लोकांच्या हातात किंवा खिशात असतांना त्यांचा स्फोट झाला. या स्फोटात हिजबुल्लाच्या ५०० हून अधिक आतंकवाद्यांना डोळे गमवावे लागले आहेत. या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचा दावा केला जात आहे. हिजबुल्ला संघटना संवादासाठी सर्वांत सुरक्षित साधन म्हणून पेजरचा वापर करत होती. हिजबुल्लाने या आक्रमणाच्या प्रकरणी इस्रायलवर आरोप केला आहे. यावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हिजबुल्लाने ‘या आक्रणाचा इस्रायलवर सूड उगवला जाईल’, अशी धमकी दिली आहे.

पेजरमध्ये मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी स्फोट कसे झाले ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र प्रसारमाध्यमांच्या वृत्तामध्ये या उपकरणांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले आहे की, स्फोट झालेले पेजर अलीकडेच तैवानच्या एका आस्थापनाकडून आयात केले गेले होते; मात्र हे पेजर्स हिजबुल्लाकडे पोचवण्यापूर्वी इस्रायली गुप्तचर संस्था मोसादपर्यंत पोचले. येथे या पेजर्समध्ये छोटी स्फोटके बसवून त्यांचे बाँबमध्ये रूपांतर करण्यात आले. बाहेरून कमांड (आदेशाचे संदेश) पाठवून त्याचा स्फोट घडवून आणण्यात आला.

आक्रमणाविषयी कोणतीही माहिती नव्हती ! – अमेरिका

पेजरद्वारे करण्यात आलेल्या स्फोटांविषयी कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकी सरकारच्या प्रवक्त्या कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले की, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात चालू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.


काय आहे पेजर ?

पेजर हे एक वायरलेस उपकरण आहे, जे संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. हे सहसा लहान स्क्रीन आणि मर्यादित ’कीपॅड’सह येते. त्याच्या साहाय्याने संदेश किंवा अलर्ट पटकन मिळू शकतात. भ्रमणभाष संचांच्या आधी पेजरचा वापर प्रचलित होता. नंतर त्याचा वापर हळूहळू अल्प होत गेला. लेबनॉनमध्ये आताही ते वापरले जातात.