बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !
हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे ‘बीसीसीआय’कडे मागणी !
मुंबई – आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडे (‘बीसीसीआय’कडे) केली आहे. याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बीसीसीआयच्या मुंबईतील विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. या वेळी समितीचे अधिवक्ता अनीश परळकर, मानव सेवा प्रतिष्ठानचे श्री. विनायक शिंदे, धर्मप्रेमी अधिवक्ता राहुल पाटकर, श्री. रवींद्र दासारी, श्री. संदीप तुळसकर हे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
या वेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशसमवेत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे क्रिकेट सामने चेन्नई, कानपूर, ग्वाल्हेर, देहली आणि भाग्यनगर (हैदराबाद) येथे होणार आहेत. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदु समाजावर सातत्याने आक्रमणे चालू आहेत. आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदुविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे. तिथे हिंदु समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे. नुकतीच उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जिहादी जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून दोन्ही डोळे काढून चिरडले. अशा प्रकारे बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे करणे, त्यांच्या निर्घृण हत्या करणे, हे राजरोसपणे चालू आहे.
मुसलमान समाजावर होणार्या कोणत्याही आघाताला इतर मुसलमान देश तीव्र विरोध करतात, तशीच भूमिका भारताने हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात घ्यावी. बांगलादेशात तेथील धर्मांध जिहादी हे हिंदूंच्या राजरोसपणे हत्या करणार, हिंदूंची घरे जाळणार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार, भूमी बळकावणार, हिंदु महिलांवर बलात्कार करणार आणि आम्ही त्यांच्यासमवेत क्रिकेटचे सामने खेळायचे का ? हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असेही समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ? |