चिंचवड (पुणे) येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ गेल्या ८ वर्षांपासून बंद स्थितीत !
पिंपरी (पुणे), १७ सप्टेंबर (वार्ता.) – महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली गेले ८ वर्षांपासून बंद आहे. आतापर्यंत या प्राणी संग्रहालयावर २० कोटी रुपयांचा व्यय करण्यात आला आहे. त्यात आणखी २४ कोटी रुपयांची निविदा स्थापत्य उद्यान विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून बंद आहे.
१. नूतनीकरणासाठी मे २०१६ मध्ये प्रारंभ करण्यात आला. तेव्हापासून हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे.
२. या प्राणी संग्रहालयास ‘केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणा’ने मान्यता दिल्यानंतर २० कोटी रुपयांचे काम करण्यास प्रारंभ केला होता. या कामांमध्ये अपहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
३. प्राणी संग्रहालयाच्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्षांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आला होता.
४. सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर ‘प्राणी संग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळा’कडे हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.